महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ एप्रिल । भोसरी एमआयडीसी व भोसरी परिसरातील वीजपुरवठा दररोज खंडित होत आहे. त्यामुळे उद्योग नगरीमधील विजेचा लपंडाव सुरू असून व्यवसायिक व नागारीक हैराण झाले आहेत. याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये भार नियमन सुरू आहे. त्यामुळे व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका बसत असून आर्थिक नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे.
भोसरी परिसरात चार हजाराच्या आसपास कंपन्या असून कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विविध उत्पादन सुरू असते. सकाळी मशीन सुरू केल्यावर मशीनच्या तापमानाचा समतोल साधेपर्यंत वेळ जातो आणि त्यात लाईट गेल्यावर पुन्हा तापमानाचा समतोल साधायला वेळ जातो आणि तिथून पुढे काम सुरू केले जाते.कंपंनीमधील कर्मचारी वेळेत आले तरी दिवसाचे ठरलेले उत्पादन पूर्ण करायला वेळ लागतो. उत्पादन वेळेत न झाल्यास त्याचा परिणाम तोटा सहन करावा लागतो. महावितरण कंपनीने भारनियमनाचे निश्चित वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
एमआयडीसीमधील अनेक मोठ्या कंपन्यांवर विविध छोटे लघु उद्योग अवलंबून आहेत. पॅकेजिंग, मोल्डिंग, पेंटिंग या विभागातील कंपन्यांची अवस्था बिकट होत आहे. आधीचे दोन वर्ष लोकडाऊन आणि निर्बंधांमुळे बिकट गेली असताना विजेच्या लपंडावामुळे आर्थिक नुकसानीत अजून भर पडत आहे.
भार नियमन कमी करण्याचे आमचे प्रयत्न सुरू असून वेळापत्रक बनवण्याचे काम सुरू असल्याची माहिती महावितरणच्या अधिकार्यांनी दिली.उद्योग नगरीत भार नियमन बाबत वेळापत्रक अद्याप उपलब्ध नसल्याने वेळेचे गणित जुळवून काम करणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे कर्मचार्यांना तसेच बसून राहावे लागते. ज्या मशीनचे तापमान समतोल व्हायला वेळ लागतो अशा मशीन दिवसभर बंद ठेवाव्या लागतात.