IPL 2022 खेळाला गालबोट ! भर मैदानात हर्षल पटेल रियान परागच्या अंगावर धावला

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२७ एप्रिल । राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघामध्ये मंगळवारी आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 39 वा सामना रंगला. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर हा सामना झाला. या रॉयल लढतीमध्ये राजस्थानने बंगळुरुचा पराभव केला आणि गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली. लो स्कोरिंग मॅचमध्ये दोन्ही संघांच्या फलंदाजांनी माती खाल्ली, मात्र गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर राजस्थानने विजय मिळवला.

राजस्थानच्या विजयामध्ये गोलंदाजांसह रियान परागचेही महत्त्वाचे योगदान राहिले. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत असताना रियान परागने एका बाजूने खिंड लढवली आणि 31 चेंडूत 56 धावांची खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. अर्धशतकीय खेळीदरम्यान परागने 3 चौकार आणि 4 षटकार ठोकले. अखेरच्या षटकामध्ये परागने 18 धावांची लयलूट केली. मात्र या नंतर मैदानामध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. रियान पराग आणि हर्षल पटेल यांच्यात भर मैदानात तूतू-मेमे झाली.

राजस्थान रॉयल्सने एकोणीसाव्या षटकापर्यंत 8 बाद 126 धावा केल्या होत्या. विसावे षटक टाकण्यासाठी गेल्या आयपीएलचा पर्पल कॅप विनर खेळाडू हर्षल पटेल आला. त्याच्या या षटकामध्ये रियान पराग याने एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 18 धावा वसूल केल्या. अखेरच्या चेंडूवर डीप मिडविकेटवर षटकार लगावल्यानंतर पराग पवेलियनकडे परतत असताना हर्षल पटेल याच्यासोबत त्याची बाचाबाची झाली. दोघांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले होते. यावेळी हर्षल पटेल हा रियान परागच्या अंगावर धावून गेला. मात्र काही खेळाडूंनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला. परंतु सामना संपल्यानंतरही हर्षल पटेल याचा अडेलटट्टूपणा दिसून आला आणि त्याने रियान पराग याच्याची हस्तांदोलनही केले नाही. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सुमार फलंदाजी

प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने दुसऱ्याच षटकामध्ये सलामीवीर देवदत्त पडिकल याची विकेट गमावली. पाठोपाठ आर. अश्विन आणि फॉर्मात असणारा जोस बटलरही माघारी परतला. कर्णधार संजू सॅमसन याने 27 धावा केल्या, मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. रियान पराग याने एकाकी झुंज दिली. बंगळुरुकडून मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड, वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर हर्षल पटेलला एक विकेट मिळाली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *