महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२७ एप्रिल । राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांची एक बैठक घेणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करायची का यावर देखील चर्चा होणार आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा
काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याच विषयावर पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे घाबरू नका, असे आवाहन त्यांनी केले होते. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.
वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पुन्हा मास्कसक्ती लागू करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱयांना 500 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. शाळा मात्र सुरूच राहतील. बुधवारी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकार अधिकृत आदेश जारी करणार आहे.