योगींच्या ‘त्या’ तीन वाक्यांचा परिणाम ; उत्तर प्रदेशात मंदिर-मशिदींनी आवाजावर घातली बंधनं

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२८ एप्रिल । उत्तर प्रदेशमधील ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. तर ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चिक करुन देण्यात आली आहे. मागील चार दिवसांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी दिली. राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत भोंग्यांच्या आवाजासंदर्भात तातडीने कारवाई करण्यासंदर्भातील निर्देश जिल्हास्तरीय प्रशासनाला दिल्यानंतर राज्यात भोंग्याविरोधातील मोहीम सुरु करण्यात आलीय.

“राज्यभरामध्ये धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवणे तसेच त्यांच्या आवाजाची मर्यादा निश्चित करण्याची मोहीम हाती घेण्यात आलीय. याच अंतर्गत एकूण १० हजार ९२३ भोंगे हटवण्यात आलेत. तर ३५ हजार २२१ भोंग्यांच्या आवाजाला मर्यादा घालून देण्यात आलीय,” असं अतिरिक्त निर्देशक सचिव (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी म्हटलंय.

मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या विषयासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धार्मिक मान्यतांचं पालन करण्याचा अधिकार आहे. मात्र त्याचा दुसऱ्यांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली गेली पाहिजे, असं मत व्यक्त केलेलं. “भोंगे वापरण्याला हरकत नाही. मात्र भोंग्यांचा आवाज त्या धार्मिक स्थळांच्या आवातापुरता मर्यादित राहील याची काळजी घ्या. याचा इतर लोकांना काही तार्स होता कामा नये,” असं योगी बैठकीमध्ये म्हणाले होते.

यानंतर गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत हिंदू आणि मुस्लीम धर्मीय नेत्यांनी चर्चा केली. या चर्चेदरम्यान हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाजाच्या धार्मिक नेत्यांनी भोंग्यांचा आवाज कमी करण्यावर सहमती दर्शवली.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार मथुरेमधील श्री कृष्ण जन्मभूमी मंदिराने रोज पहाटे पाच वाजता भोंग्यावरुन म्हटली जाणारी मंगल चरण आरती भोंग्यावर न वाजवण्याचा निर्णय घेतला. भागवत भवन येते श्री कृष्ण जन्मभूमीच्या आवारामध्ये रोज पहाटे पाच वाजता भोंग्यावरुन एक तास आरती ऐकवली जायची. अशाच प्रकारे अयोध्येसहीत इतर शहरांमधून प्रतिसाद मिळत असून अनेकांनी स्वइच्छेने आवाजावर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतलाय.

लखनऊमधील इदगाहचे इमाम असणाऱ्या मौलाना खलिद रशिद फिरंगी महाली यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सर्व सुन्नी मशिदींना भोंग्यांचे आवाज कमी करण्याचे निर्देश दिल्याचं म्हटलंय. “आम्ही सर्व मशिदींमधील भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले असून आवाज मशिदीबाहेर येणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलंय,” असं इमाम म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *