महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.३ मे । कोविडच्या सावलीत दोन वर्षे घालवल्यानंतर या वर्षी अक्षय्य तृतीयेला बाजारातील चमक पुन्हा पूर्णपणे परतण्याची अपेक्षा आहे. एका दिवसात देशभरात १५,००० कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री होऊ शकते आणि ती कोविडपूर्वच्या तुलनेत दीडपट जास्त असेल. त्याच वेळी वजनात सोन्याची विक्री कोविडपूर्वच्या तुलनेत २३ टक्के जास्त असण्याची शक्यता आहे. यापूर्वी, गेल्या दोन वर्षांत लॉकडाऊनमुळे अक्षय्य तृतीयेला सोन्याची विक्री एक ते दोन टनांपर्यंत कमी झाली होती.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीआर सोमसुंदरम यांच्या मते, दोन वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला सराफा व्यवसाय चांगला राहण्याची अपेक्षा आहे. भारतात सोन्याशी धार्मिक आणि सांस्कृतिक भावना निगडित आहेत. गेल्या दोन वर्षात अक्षय्य तृतीयेच्या लॉकडाऊनमुळे सराफा व्यवसाय फारसा चांगला नव्हता, पण या वर्षी कोविडचा प्रादुर्भाव कमी आहे आणि आर्थिक घडामोडींनाही वेग आला आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देशात साधारणपणे २० ते २५ टन सोन्याची विक्री होते. मात्र या वर्षी सुमारे ३० टन सोन्याची विक्री होण्याची शक्यता आहे.
सोन्याच्या सध्याच्या दरानुसार यंदा अक्षय्य तृतीयेला १५ हजार कोटी रुपयांचे सोने विकले जाऊ शकते. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी सांगितले की, या वर्षी ग्राहकांची भावना चांगली आहे. कोरोनाची भीती आणि त्याच्याशी निगडित निर्बंध संपले आहेत, तर गेल्या काही दिवसांपासून किमती घसरल्या आहेत.
सोन्याचा भाव ५५,००० च्या वर जाऊ शकताे
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या मते, १२ महिन्यांच्या दृष्टिकोनातून, कॉमेक्सवर सोने २,०५० डॉलर प्रति औंस म्हणजेच ५५,३२० रुपये प्रति १० ग्रॅमच्या श्रेणीत व्यवहार करू शकते. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांच्या मते सोन्यामध्ये तेजीचा कल कायम राहण्याची अपेक्षा आहे. यंदा ते ५५,००० रुपयांचा टप्पा ओलांडू शकते. त्या अर्थाने सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही चांगली वेळ आहे.