महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.३ मे । अक्षय्यतृतीया हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी घरोघरी पाळला जातो. पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे आदरने पूजन केले जातं. जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात अक्षय्यतृतीया साजरी करण्यात येते.
गावाकडे पितरांची नेमकी पुजा कशी केली जाते?
अक्षय्यतृतीयेच्या दिवशी गावातील कुंभाराकडुन मातीची घागर आणि एक छोटे मडके आणले जाते. नंतर त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकल्या जातो. त्यामुळे या पाण्याला सुगंध येतो. नंतर घरातील एखादा सदस्य जाऊन शेतातून पळसाचे पान आणुन त्याचे पत्रावळी व द्रोण हाताने तयार करतो. हे पत्रावळी आणि द्रोण तयार करणे एक कलाच आहे. तो पर्यंत घरातील महिलामंडळी आमरसाचा स्वयंपाक करतात. (वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पदार्थ असतात) नंतर नैवैद्याचे ताट पत्रावळीवर काढले जाते त्यात आंब्याचा रस,पोळी, शेवयाचा भात, भजी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात.
पाण्याने भरलेल्या घागरीवर हे ताट ठेवुन ते पुर्वजाच्या फोटोसमोर ठेवुन फोटोची पुजा केली जाते. संपूर्ण कुटुंब आदराने पूर्वजांसमोर नतमस्तक होऊन त्यांचे आशिर्वाद घेतात. पुढे पै-पाहुण्यातील एका पित्राला जेवायला बोलावलेले असते त्या पित्राचे पाय धुवून त्यानां गंधगोळी लावून त्यांना प्रेमाने जेवू घातलं जातं. अशा रितीने विदर्भात आखजी म्हणजे अक्षय्यतृतीया साजरी होते.
या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य’ (न संपणारे) असे मिळते, असा गावाकडे समज आहे. या दिवसांचे आणखी एक महत्त्व म्हणजे अक्षय्य तृतीयेला देवभूमी उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते.
अक्षय्यतृतीया आणि शेतकरी
अक्षय्य तृतीयेनंतर दिड महिण्यानंतर पावसाळा येणार असतो.गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मातीप्रती कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मातीमध्ये आळी घालतात.
कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी शेतकरी मायबापाची समज आहे.महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही.
त्यामुळे पावसाळा तोंडावर असताना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये पेरणी करणे सोपे जाते. पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भातील काही भागात अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी फळबागाची लागवड केली जाते कारण हेच की अक्षय्यतृतीयाच्या मुहूर्तावर लागवड केलेल्यास फळ उत्पादन भरघोस येते अशी समजूत आहे
अक्षय्य तृतीयेला सोनं का खरेदी करतात?
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण कोणत्याही वेळी सोनं खरेदी करू शकतो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा संपूर्ण दिवस शुभ असतो. या दिवशी सोनं खरेदी करून घरी आणल्यास व्यक्तीचा भाग्योदय होतो असं म्हणतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करण्यामागे एक मान्यता आहे की, शेतीतील माल विकलेला असतो मग थोड्या रक्कमेतुन सोनं घेतलं जातं तसेच शहरी भागातील गृहिणी वर्षभर काटकसरीने संसार करुन काही पैसा मागे टाकतात अन मग अक्षय्यतृतीया चांगला मुहूर्त असतो म्हणून जमलेल्या पैसातुन सोनं खरेदी करतात.
असं म्हणतात की अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्य सर्वाधिक तेजस्वी असतो, म्हणूनच कदाचित सोन्याची तुलना सूर्यासोबत केली गेली आहे. सोनं शक्ती आणि बलाचं प्रतिक आहे आणि या दिवशी सोनं खरेदी केल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. प्राचीन काळापासूनच सोनं हे एक बहुमूल्य धातू आणि धन-संपत्तीचं प्रतिक मानलं गेलंय. अक्षय्य तृतीयेच्या या विशेष दिवशी सोनं खरेदी केल्यास घरात समृद्धी येते आणि आर्थिक संकटं दूर होतात असा ही समज लोकांमध्ये आहे.