महाराष्ट्र २४- ऑनलाईन ; मुंबई : लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक वस्तूंचा साठा आणि त्याची काळाबाजारी होत असल्याचे दिसून आले आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी काळाबाजार करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश केंद्र सरकारकडून बुधवारी राज्य सरकारांना देण्यात आले. अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ नुसार संबंधितांविरोधात यापुढील काळात कारवाई होणार आहे.
जीवनावश्यक वस्तुंचा अनेकजण साठा करीत असल्याचे तसेच त्या काळ्या बाजारात भरमसाठ दराने विकत असल्याचे दिसून आले आहे. असले प्रकार टाळण्यासाठी साठेबाजावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे केंद्राने आपल्या निर्देशात म्हटले आहे.
दरम्यान, खासगी लॅबमध्ये कोरोनाची मोफत चाचणी व्हावी, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. एक अशी प्रक्रिया बनवली पाहिजे की, ज्याद्वारे लोक खासगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी घेतील आणि नंतर त्या लॅबचा पैसा सरकार अदा करेल, असे सांगतानाच कोरोना विरुद्धच्या लढाईत डॉक्टर आणि मेडिकल स्टाफ हे योध्दा असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली.