महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ मे ।भोंग्याच्या प्रश्नावरुन सध्या राज्यभर तणाव पसरला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना बोलताना राज ठाकरे यांना टोला लगावला. कुणीही कायदा हातात घेऊ नये असा इशाराही त्यांनी बोलताना दिला आहे.
भोंग्याच्या प्रकरणावर ते माध्यमांना बोलत होते. “सध्या राज्यात वातावरण तापलं असून भोंग्यावरुन कुणी अल्टिमेटमची भाषा करु नये. कायदा सर्वांना सारखा असतो, सर्वांना कायद्याचं सारखं पालन करावं लागणार आहे. तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर घरात बसून घरच्यांसाठी द्या, आम्हाला सांगू नका” असा इशारा त्यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.
राज्यात तणाव निर्माण होऊ नये म्हणून गृहखात्याने पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे राज्यात तणाव निर्माण होणार नाही यासाठी जनतेने सरकारला आणि पोलिसांना शांतता व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी मदत करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी केलं.
“तीन तारखेला अक्षय्य तृतीयेच्या दिवशीही या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती. पण कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर पोलिस कारवाई करणार आहेत. तसेच उत्तरप्रदेशच्या जहांगीरपुरीतल्या मंदीरावरील आणि मशिदीवरीलही भोंगें काढले आहेत. तिथे कुठलेही आदेश दिले नव्हते, त्यांनी फक्त लोकांना आवाहन केलं आणि तेथील लोकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.” असं ते बोलताना म्हणाले आहेत.