महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ मे । चार धाम यात्रा (Char Dham Yatra) ३ मे रोजी सुरू झाली आहे. त्यासाठी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर गंगोत्री धाम आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचे (Kedarnath Temple Opened) आज शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दरवाजे उघडण्यात आले. कोरोनाच्या दोन वर्षानंतर हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. यावेळी हजारो भाविकांसह उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी देखील उपस्थित होते.
केदारनाथ मंदिर हे उत्तराखंडमधील चार धाम आणि पंच केदार यांचा एक भाग आहे आणि भारतातील भगवान शिव यांच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. इथं चार धाम यात्रेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पण, कोरोनामुळे भाविकांना प्रवेश दिला जात नव्हता. अखेर आजपासून सर्वसामान्य भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे. पण, उत्तराखंड सरकारने कोरोनामुळे चार धाम यात्रा २०२२ साठी यात्रेकरूंच्या संख्येची दैनिक मर्यादा निश्चित केली आहे. केदारनाथ मंदिरासाठी दैनिक मर्यादा 12,000 आणि बद्रीनाथसाठी 15,000, तर गंगोत्री धामसाठी दैनंदिन मर्यादा 47000 आणि यमुनोत्री धाम 4,000 ठेवण्यात आली आहे. कोरोनामुळे भाविकांची संख्या ठरवून दिली असली तरी चारधाम यात्रेसाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र किंवा कोरोना लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य नाही, असंही धामी सरकारकडून सांगण्यात आलं आहे. बाबा केदारनाथचे दरवाजे उघडल्यानंतर आजपासून भाविकांना मोक्ष आणि मनोकामना पूर्ण होताना पाहता येणार आहेत, असे आचार्य शैलेश तिवारी म्हणाले.
केदारनाथ मंदिरात जाणाऱ्या यात्रेकरूला पूजा, आरती आणि प्रसाद ठेवायचा असेल तर त्यासाठी आधी नोंदणी करावी लागले, असे श्री बदरीनाथ केदारनाथ मंदिर समितीने म्हटले आहे. नोंदणीसाठी, अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि मोबाईल क्रमांक, नाव, लिंग आणि मेल आयडी टाकून नोंदणी करावी लागणार आहे.