महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० मे । मुंबईच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे प्रशासनानेदेखील पुणे स्थानकावरचे (Pune Railway Station) प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर (Platform Ticket Rate) वाढविण्याच्या विचार केला आहे. तसा प्रस्तावदेखील स्टेशन संचालकाकडून देण्यात येत आहे.
गर्दीच्या हंगामात पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांना एसीपी (अलार्म चेन पुलिंग) केले जाते. त्यामुळे रेल्वेचे होणारे आर्थिक नुकसान प्रवाशांकडून वसूल करण्यासाठी रेल्वे ही दरवाढ करू शकते. मुंबई रेल्वे विभागाने ‘सीएसएमटी’सह अन्य पाच स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात वाढ करून ते पन्नास रुपये केले आहे. पुणे स्थानकावर देखील प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर पन्नास रुपये होऊ शकते.
पुणे स्थानकांवर रोज किमान तीन ते चार रेल्वे साखळी ओढून थांबविल्या जातात. आरपीएफ या संदर्भात गुन्हे दाखल करून कारवाईदेखील करते मात्र तरीही साखळी ओढून रेल्वे थांबविण्याच्या प्रकारात घट झालेली नाही. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन रेल्वेचा होणारे आर्थिक नुकसान वसूल करण्यासाठी प्रवाशांच्या खिशातच हात घालत आहे. काही प्रवाशांच्या चुकीची शिक्षा प्लॅटफॉर्मवर नातेवाइकांना सोडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सहन करावी लागणार आहे. तब्बल पाचपट रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे.