महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० मे । देशात महागाईने आधीच प्रचंड कहर केला असताना सोमवारी रुपयाने मोठी गटांगळी खाल्ली. अमेरिकन डॉलरसमोर रुपयाने 52 पैशांच्या घसरणीसह 77.42 ची ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली. विदेशी बाजारपेठेतील डॉलरची ताकद, इंधन दरवाढ तसेच इतर वस्तूंची महागाई अशा विविध कारणांमुळे रुपया दुबळा झाला. पुढील काही दिवसांत रुपया 79ची पातळी गाठेल. परिणामी, महागाईचा भयंकर भडका उडेल, असा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे.
भांडवली बाजारात झालेल्या मोठय़ा पडझडीची झळ रुपयाला बसली. सोमवारी चलन बाजारात रुपया 77.17 वर खुला झाला. त्यात 52 पैशांची घसरण झाली आणि तो 77.42च्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेला. शुक्रवारीही रुपया डॉलरपुढे 55 पैशांनी कमजोर झाला होता. यापूर्वी मार्चमध्ये रुपयाने 76.98ची नीचांकी पातळी गाठली होती. त्यानंतर सोमवारी दिवसाखेरीस रुपयाने 77.42ची आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठली.