श्रीलंकेत आता हिंसाचार ; राजीनाम्यानंतर पंतप्रधान राजपक्षे यांच्या घराला लावली आग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० मे । श्रीलंकेतील (Sri Lanka) अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीमुळे सिव्हिल वॉरची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Prime Minister Mahinda Rajapaksa) यांनी विरोधकांच्या दबावाखाली राजीनामा दिला. त्यानंतर सर्वत्र हिंसक घटना घडत आहेत. राजपक्षे कुटुंबीयांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये रस्त्यावर रक्तरंजित चकमकी सुरू आहेत. सरकार समर्थकांच्या हिंसाचारात आतापर्यंत खासदारासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबीयांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर परिस्थिती चिघळली. सैन्याला बोलावावं लागलं. सर्वसामान्यांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदार, मंत्र्यांसह अन्य नेत्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. जमावापासून वाचण्यासाठी एका खासदाराने आत्महत्या केली, तर दोन मंत्र्यांची घरे जाळण्यात आली.

श्रीलंकेतील हंबनटोटा येथे आंदोलकांनी महिंदा राजपक्षे यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत. याशिवाय काही मंत्र्यांच्या घरांची तोडफोड आणि जाळपोळही करण्यात आली आहे.

श्रीलंकेतील सर्व शहरांमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हिंसाचार रोखण्यासाठी पोलीस आंदोलकांवर अश्रुधुराचा आणि बळाचा वापर करत आहेत. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं दिसत असून आंदोलकांची संख्या वाढत आहे.

सत्ताधारी पक्षाचे खासदार अमरकीर्ती अथुकोराला यांनी सोमवारी प्रथम सरकारविरोधी निदर्शकांवर गोळीबार केला आणि नंतर स्वत:वर गोळी झाडली. कोलंबोच्या हद्दीत हा अपघात झाला.

न्यूज एजन्सी एएफपीनुसार पोलिसांनी सांगितलं की, अमरकिर्तीने निट्टामबुआ येथे त्यांची कार थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन लोकांवर गोळीबार केला. गोळी लागून एकाचा मृत्यू झाला. यानंतर लोकांचा रोष टाळण्यासाठी खासदाराने जवळच असलेल्या इमारतीत लपण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त लोकांनी संपूर्ण इमारतीला घेराव घातला. लोकांनी वेढलेले पाहून खासदाराने स्वत:वर गोळी झाडली, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

आतापर्यंत 138 जण जखमी

सरकार समर्थकांनी आंदोलकांवर हल्ला केल्यानंतर उलट हिंसाचार सुरू झाला. कोलंबोमध्ये झालेल्या या संघर्षात 138 जण जखमी झाले होते. त्यांना कोलंबो नॅशनल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे मोठ्या शहरांमध्ये सैन्य तैनात करू शकतात, असे मानलं जात आहे.

श्रीलंकेत अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक

श्रीलंकेत अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक +94-773727832 आणि ईमेल आयडी cons.colombo@mea.gov.in जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *