महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.१७ मे । गव्हाच्या भावाने सर्वसामान्य नागरिकांचे पीठ काढले आहेत. पण गव्हाचे भाव इतके का वाढत आहेत? किमान आधारभूत किंमत (MSP) 2015 रुपये प्रतिक्विंटल आहे, परंतु अनेक राज्यांमध्ये या आधारभूत किमतींपेक्षा चढ्या भावाने गव्हाची विक्री सुरू आहे. आता, महागाईला आळा घालण्यासाठी सरकारने गव्हाच्या निर्यातीवर (Wheat Export) बंदी घातली आहे. गहू निर्यातीवर बंदी असूनही त्याचे भाव अद्याप कमी होताना दिसत नाहीत. देशातील अनेक मंडयांमध्ये किमान आधारभूत किंमतीपेक्षा (MSP) गहू 400-500 रुपये प्रतिक्विंटल अधिक दराने विकला जात आहे. 15 मे रोजी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील औसा (Ausa) मंडी येथे त्याची कमाल किंमत 2,676 रुपये प्रतिक्विंटल या विक्रमी उच्चांकी पातळीवर (Higher Level) पोहोचली. तर सरासरी 3215 रुपये प्रतिक्विंटल भाव होता. 14 मे रोजी गुजरातमधील बनासकांठा येथील दिसा मंडी येथे कमाल भाव 2905 रुपये होता आणि सरासरी भाव 2,300 रुपये प्रति क्विंटल होता. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात गव्हाचे दर अजूनही एमएसपीपेक्षा जास्त आहेत.
अशा परिस्थितीत केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा यांनी गव्हाच्या उत्पादनाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. आहुजा यांच्या मते, यंदा विशेषत: वायव्य भारतात उष्णतेच्या लाटांचा गहू पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे, परंतु उपलब्धतेतील फरक गेल्या वर्षीच्या तुलनेत किरकोळ आहे. मग प्रश्न उरतो की, असे असतानाही गव्हाचे भाव इतके चढे का आहेत?