महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.१८ मे । शिर्डीच्या साईबाबांवर जगभरातील करोडो भाविकांची अपार श्रद्धा आहे. साई दर्शनासाठी शिर्डीत आल्यावर किंवा ऑनलाइन स्वरूपात अनेकजण आपआपल्या परीने साईचरणी दान करत असतात. हैदराबाद येथील एका भाविकाने साई चरणी दोन कोटींपेक्षा जास्त रुपयांचे सोने दान केले आहे. या दानाची चर्चा सध्या सर्वत्र ऐकायला मिळत आहे.
शिर्डीच्या साईबाबांच्या झोळीत पुन्हा एकदा दोन कोटीच्या सोनाचे महादान आले आहे. साईबाबांचे सिंहासन सोन्याचे झाले होते मात्र मूर्तीच्या खालील चौथरा बाकी होता. त्यास देखील भाविकाने सोन्याने मढवले आहे. 4 किलो सोन्याच्या पट्टीने बाबाच्या मूर्ती खालील भागाला सुवर्णमय करण्यात आले असून आता साईंबाबांचे संपुर्ण सिंहासन सोन्याचे झाले आहे.
हैदराबाद येथील पार्थ रेड्डी या साईभक्ताने 4 किलो वजनाचे तब्बल 2 कोटींपेक्षा अधिक रुपयांचे सोने साईचरणी दान दिले असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. यानंतर रेड्डी यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
साईबाबांच्या मुर्तीला सन 2008 साली 110 किलो सोन्याचे सिंहासन बसविले गेले होते. त्यासाठी आंध्र प्रदेशातील साईभक्त आदिनारायण रेड्डी यांनी हे सोने दान केले होते. साईच्या मुर्तीला सुवर्ण सिंहासन बसवण्यात आले, मात्र मुर्तीच्या चौथ्यायाला सुवर्णाने मढवण्याचे राहिले होते. त्यासाठीची पट्टी देण्याची ईच्छा साईभक्त पार्थसार्थ रेड्डी यांनी 2016 मध्येच केली होती. मात्र त्या नंतर कोरोना काळ सुरू झाल्यामुळे ही पट्टी बसविता आली नव्हती. आता कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर सर्व पुर्वपदावर आल्याने साईभक्त पार्थसार्थ रेड्डी यांनी चार किलो सोन्यापासून अत्यंत सुबक आणि आकर्षक हत्ती, मोर आणि फुलांचे असे पौराणिक नक्षीकाम केलेली ही पट्टी साईच्या मुर्तीच्या चौथऱ्याला बसवली आहे.