RCB साठी ‘प्ले ऑफ’ची आज अखेरची संधी ; विजय आवश्‍यक

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ मे । IPL 2022: आयपीएलच्या साखळी सामन्याचे मोजकेच सामने शिल्लक असले तरी गुजरात टायटन्स वगळता एकही संघ प्ले ऑफमध्ये पोहोचलेला नाही. याच पार्श्वभूमीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरसाठी आजची लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे. याप्रसंगी फाफ ड्युप्लेसिसचा संघ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सशी दोन हात करणार आहे.

आतापर्यंत सात लढतींमध्ये विजय मिळवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला या लढतीत विजयाची नितांत गरज आहे. या लढतीत विजय मिळवल्यानंतर त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत कायम राहता येणार आहे.

गुजरातने या मोसमात १३ लढतींमधून १० मध्ये विजय मिळवला असून ३ लढतींमध्ये त्यांना हार सहन करावी लागली आहे. २० गुणांसह हा संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानावर विराजमान आहे. अखेरच्या लढतीत या संघाचा पराभव झाला तरी त्यांच्यावर काही फरक पडणार नाही. ते पहिल्या स्थानावर कायम राहणार असून यामुळे त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी उपलब्ध असणार आहेत. क्वॉलीफायर वन व क्वॉलीफायर टू अशा दोन लढती त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी मिळणार आहेत.

शुभमन गिल, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया या फलंदाजांनी संघाला गरज असताना सामना जिंकून देणाऱ्या खेळी केल्या आहेत. एवढेच नव्हे तर फिरकी गोलंदाज राशीद खान यानेही फलंदाजीत लक्षणीय कामगिरी करून दाखवली आहे.

फलंदाजांना ठसा उमटवावा लागेल
बंगळूर संघात एकापेक्षा एक अव्वल फलंदाजांची फौज आहे. कर्णधार फाफ ड्युप्लेसिस (३९९ धावा), विराट कोहली (२३६ धावा), दिनेश कार्तिक (२८५ धावा), ग्लेन मॅक्सवेल (२२८ धावा), रजत पटीदार (१६३ धावा), महिपाल लोमरोर (६४ धावा) यांच्याकडून बंगळूरला मोठ्या अपेक्षा आहेत. पण मागील काही सामन्यांमध्ये या सर्व फलंदाजांना ठसा उमटवता आलेला नाही. त्यामुळे आता अखेरच्या लढतीत या सर्व फलंदाजांना धावांचा रतीब उभारावा लागणार आहे. बंगळूरला या लढतीत मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

हसरंगा, हर्षलवर मदार
बंगळूर संघाची गोलंदाजीची मदार वनिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल या दोघांवर आहे. मागील लढतीत या दोघांनीही चमक दाखवली होती, पण या लढतीत बंगळूरला पंजाबकडून हार सहन करावी लागली होती. या आधीच्या दोन लढतींत बंगळूरने विजय मिळवला होता. पण पंजाबविरुद्धच्या पराभवाने हा संघ मागे फेकला गेला आहे. मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवूड यांना दबावाखाली खेळ उंचवावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *