महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० मे । मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा 5 जून रोजीचा अयोध्या दौरा स्थगित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनूसार, राज ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे 5 जूनला होणारा अयोध्या दौरा पुढे ढकलला जाऊ शकतो. लवकरच स्वत: राज ठाकरे याबाबत सोशल मीडियावर अधिकृत माहिती देणार असल्याचे बोलले जात आहे.
राज ठाकरे यांना प्रकृतीच्या कारणास्तवच आपला पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईला परतावे लागले. मीडिया रिपोर्ट्सनूसार राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली असून त्याबाबतीत शस्त्रक्रीया करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच राज ठाकरे दौऱ्याबाबत अधिकृत माहिती देतील, असे सांगण्यात येत आहे.
पुण्यातील स्वारगेट भागातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे 22 मेरोजी राज ठाकरेंची सभा होत आहे. या सभेत ते अयोध्या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती देतील, अशी माहिती आहे.
पुण्यातील 22 मेच्या सभेकडे लक्ष
राज ठाकरे हे महाराष्ट्राचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसेच्या अयोध्या दौऱ्याला उघड विरोध करून त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. खासदार ब्रिजभूषण यांच्यामुळे राज ठाकरे यांची मराठी भाषिकांमध्ये असलेल्या आक्रमक नेता या प्रतिमेला काहीसा तडा बसत आहे. त्यामुळेच 22 मे रोजी पुण्यातील सभेत एमआयएमचे अकबरुद्दीन ओबेसी आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह या दोघांनाही राज ठाकरे सडेतोड उत्तर देऊ शकतात. तसेच, आपल्या अयोध्या दौऱ्याबाबतदेखील ते भूमिका स्पष्ट करतील.