महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ मे । केंद्र सरकारने इंधनावरील अबकारी शुल्कात कपात केल्यानंतर अखेर राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही जनतेवर ‘दया’ दाखवत रविवारी पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) घटवला. पेट्रोलवरील व्हॅट प्रतिलिटर २ रुपये ८ पैसे आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये १ रुपया ४४ पैशांची कपात केली आहे. तत्पूर्वी शनिवारी केंद्र सरकारने पेट्रोलच्या उत्पादन शुल्काच्या दरात प्रतिलिटर ८ रुपयांनी, तर डिझेलच्या उत्पादन शुल्काच्या दरात प्रतिलिटर ६ रुपयांनी कपात केली होती.
दर कपातीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करावे, असे आवाहन केले होते. केंद्राने दरात कपात केल्यानंतर राजस्थान आणि केरळने आपल्या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात केली होती. यानंतर महाविकास आघाडी सरकारवरही दडपण होते. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे.
२५०० कोटींचा महसूल घटणार
मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता ८० कोटी रुपये महिन्याला आणि १२५ कोटी रुपये डिझेलकरिता इतके राज्य सरकारचे महसुली उत्पन्न कमी होणार आहे.
राज्य सरकारचा वर्षभरातील महसुलात एकूण २,५०० कोटींचा महसूल घटणार आहे.
१. केंद्राने इंधनावरील उत्पादन शुल्क कपात केल्यानंतर राज्य सरकारने व्हॅट कमी करावा, अन्यथा आम्ही सोमवारपासून राज्यात आंदोलन छेडू, असा इशारा भाजप प्रदेशने दिला होता.
२. वर्ष २०२१-२२ मध्ये पेट्रोलवरील व्हॅटमधून राज्याला १३ हजार ७५६ कोटी, तर डिझेलवरील व्हॅटमधून १७ हजार ८६० कोटी असा एकूण ३१ हजार ६१५ तोटी महसूल प्राप्त झाला होता.
३. महाराष्ट्र सरकार पेट्रोलवर प्रतिलिटर ३२.९० पैसे आणि डिझेलवर प्रतिलिटर २२.७० पैसे इतका व्हॅट (मूल्यवर्धित कर) आकारात होते. व्हॅट हा पूर्णपणे राज्याला प्राप्त होणारा कर आहे.