रेशन कार्ड दुरुस्तीचे काम ठप्प

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ मे । नांदेड : शासनाच्या महापीडीएस संकेतस्थळावर तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने गत काही दिवसांपासून रेशन कार्ड दुरुस्ती, नाव जोडणी, नाव कमी करणे व नवीन शिधापत्रिका बनवण्याचे काम ठप्प पडले आहे. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात सदर तांत्रित अडचण निर्माण झाल्याने शिधापत्रिकाधारकांसह सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या तांत्रिक खोड्यामुळे धान्य वाटपावरही परिणाम होत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्ह्यातील हजारो गोरगरिबांना अनुदानित दराने धान्याचे वाटप करण्यात येते. त्यामध्ये शहरी व ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचा समावेश आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याचे अधिकार हे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आहेत. परिणामी जिल्हा पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अंत्योदय, प्राधान्य गटांसह शेतकरी कुटुंबातील हजारो पात्र रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वाटप करण्यात येते. सदर धान्य हे लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात मिळत असल्याने त्याचा लाभ लाखो लाभार्थ्यांना होतो.

अनेक लाभार्थी कुटुंबांचा सपूर्ण उदरनिर्वाह याच धान्यातून होतो. त्यामुळे लाभार्थ्यांच्या जीवनात सवलतीच्या दरातील धान्य वाटपाला अतिशय महत्त्व आहे. सदर धान्याचे वाटप करताना रेशन कार्ड मोराची भूमिका बजावते. रेशन कार्ड असलेल्या पात्र लाभार्थ्यांनाच रेशनचे धान्य देण्यात येते.

रेशन कार्डमध्ये धान्य लाभार्थ्यांचे नाव कमी करणे किंवा एखाद्या लाभार्थ्यांचे नाव जोडणे, त्यात किरकोळ दुरुस्ती करण्याचे काम गत काही दिवसापासून शासनाच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ठप्प पडले आहे. याव्यतिरिक्त नवीन आरसी म्हणजेच नवीन रेशन कार्ड बनवण्याचे काम सुद्धा सद्यस्थितीत बंद आहे. त्यामुळे गरीब नगरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

धान्य वाटपावरही परिणाम

राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागासाठी विकसित करण्यात आलेल्या महापीडीएस संकेतस्थळावरील कार्यालयीन काम गत काही दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे. त्यामुळे रेशन कार्डसोबतच धान्य वाटपावरही त्याचा प्रतिकुल परिणाम दिसून येत आहे. ही अडचण संपूर्ण राज्यस्तरावर असल्याने इतर जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा त्याचा फटका बसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *