महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ मे । असंख्य श्रद्धाळूंसाठी स्वर्ग असणाऱ्या केदारनाथ धामची कवाडं अखेर खुली झाली आणि या केदारधामाला भेट देण्यासाठी भक्तांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. पण, आता मात्र परिस्थिती अवघ्या काही दिवसांतच बदलताना दिसत आहे.
हवामानात अचानकच झालेल्या बदलांमुळे केदारनाथ यात्रा तूर्तास थांबवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनानं रुद्रप्रयाग ते गौरीकुंडपर्यंत प्रवाशांना थांबवत तेथे यात्रेला थोपवून धरण्यात आलं आहे. (kedarnath yatra 2022)
हवामान खात्यानं सदर परिसरात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा देत यंत्रणांना सतर्क केलं. या इशाच्यानंतर रुद्रप्रयागपासूनच्या भागात पावसाचा तुफान मारा पाहायला मिळत आहे.
सध्याच्या घडीला यात्रा गौरीकुंड, सोनप्रयाग, गुप्तकाशी, अगस्त्यमुनी आणि रुद्रप्रयाग येथे यात्रा थांबवण्यात आली आहे. रुद्रप्रयाग ते गुप्तकाशी पर्यंत ठिकठिकाणी जवळपास 5 हजार यात्रेकरुंना थांबवण्यात आलं आहे. सोमवारीसुद्धा अवध्या एक तासासाठीच यात्रा सुरु करण्यात आली होती.
सोमवारीच सोनप्रागहून सकाळी 8 वाजेपर्यंत 8530 यात्रेकरुंना रवाना करण्यात आलं. पण, प्रशासनाचे आदेश येताच तात्काळ यात्रा थांबवण्यात आली. परिणामी सोनप्रयाग मध्ये 2000 आणि गौरीकुंड मध्ये 3200 यात्रेकरुंना आहेत त्या ठिकाणी थांबण्यास सांगण्यात आलं आहे.
आहात तिथेच थांबा…
हवामान खात्यानं दिलेला इशारा पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू न देण्यासाठी म्हणून यात्रेकरुंना घाईगडबड न करता आहात तिथेच सुरक्षित ठिकाणी थांबण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ज्या यात्रेकरुंनी खोल्या बुक केलेल्या नाहीत त्यांना अगस्त्यमुनी येथील हॉटेल, लॉज, रेस्टॉरेंट, धर्मशाळांमध्ये पाठवण्यात येत आहे. तर, ज्यांची हॉटेल बुकिंग झाली आहे त्यांना पुढील आदेश येईपर्यंत तिथेच थांबण्य़ाचं आवाहन करण्यात आलं आहे.
हेलिकॉप्टर सेवा प्रभावित
हवामानातील बदलांमुळे केदारनाथ यात्रेदरम्यान असणारी हेलिकॉप्टर सेवाही प्रभावित झाली आहे. पाऊस आणि धुक्यामुळं इथं सोमवारी दुपारपासूनच हेलिकॉप्टर सेवा बंद आहे. तेव्हा तुमचं कुणी यात्रेसाठी गेलं असल्यास किंवा तिथे जाण्याचा बेत तुम्हीही आखत असल्यास हवामान आणि काही गोष्टींची खास काळजी घ्या. प्रशासकीय आदेशांचं पालन करा.