पेट्रोल, डिझेल ; राज्य सरकारच्या कपातीचा लाभ न झाल्याने ग्राहक संभ्रमात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ मे । केंद्र सरकारने शनिवारी, २१ मे रोजी अचानक पेट्रोल व डिझेलच्या दरांत मोठी कपात केली. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात लिटरमागे ८ रुपये, तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात लिटरमागे ६ रुपये घट केली. याचा थेट परिणाम म्हणून पेट्रोल व डिझेल प्रति लिटर अनुक्रमे ९.५ आणि ७ रुपयांनी स्वस्त झाले. तर, पेट्रोल व डिझेलवर लावल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट) अनुक्रमे २.०८ रुपये आणि १.४४ रुपये कपात केल्याचे राज्य सरकारने रविवारी जाहीर केले. त्यामुळे मुंबईत सोमवारपासून पेट्रोलचा दर प्रति लिटर १०९.२७ रुपये आणि डिझेलचा प्रति लिटर ९५.८४ रुपये होणे अपेक्षित होते. मात्र सोमवारीदेखील पेट्रोलचा दर प्रति लिटर १११.३० रुपये आणि डिझेलचा दर ९७.२२ रुपये असल्याने पेट्रोलपंपांवर पोहोचलेले ग्राहक संभ्रमात पडत होते. इंधनाचा हा दरगोंधळ राज्यात दिवसभर सुरू होता.

केंद्र सरकारने ४ नोव्हेंबर २०२१ आणि २२ मे २०२२ या दोन दिवशी उत्पादन शुल्कात मोठी कपात केली. परंतु राज्य सरकारकडून व्हॅटमध्ये कपात करण्यात आलेली नाही. तसेच व्हॅटबरोबरच उपकरही राज्य सरकार आकारत आहे. हा उपकरही कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकारकडून थेट दरकपात करण्यात आलेली नाही. व्हॅटची टक्केवारी जैसे थे असल्याचे इंधनदर तज्ज्ञ व पेट्रोल व्यावसायिक डॉ. केदार चांडक यांनी ‘मटा’ला सांगितले. ते म्हणाले, ‘शनिवारी रात्री केंद्राकडून उत्पादन शुल्कात कपात केल्यावर या कमी झालेल्या शुल्कावरील व्हॅट कमी होणे अपरिहार्यच होते. परंतु राज्य सरकारने प्रसिद्धीपत्रक काढून जनतेला दिलासा दिल्याचे भासवले आहे. मागील आठ वर्षांत केंद्र सरकारने जेव्हा जेव्हा उत्पादन शुल्क वाढवले त्या प्रत्येक वेळेस राज्याला व्हॅटचे अधिक उत्पन्न मिळाले. कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे तेल कंपन्यांनी रोज पेट्रोल व डिझेलचे मूळ दर वाढवले. त्यावरही राज्याला व्हॅटचे अधिक उत्पन्न मिळाले.’

पेट्रोलपंप चालकांना जे पेट्रोल किंवा डिझेल वितरणासाठी मिळते ते खरेदी करतानाच त्या पंपचालकाने केंद्रीय व राज्य पातळीवरील सर्व कर, उपकर यांसह त्याची किंमत संबंधित तेल विपणन कंपनीला अदा केलेली असते. यातील करांचे पैसे संबंधित सरकारांना तेल विपणन कंपनी देते. त्यामुळे पंपचालकाकडून ग्राहकावर या करांचा नव्याने बोजा टाकला जात नाही. शनिवारी केंद्राकडून उत्पादन शुल्ककपात केल्यानंतर तेल विपणन कंपन्यांनी त्यांच्या नेहमीच्या शिरस्त्यानुसार सर्व पेट्रोलपंप चालकांना ई-मेल पाठवले. त्यामध्ये नवे दर रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून लागू करावेत, असे लिहिले होते. त्यानुसार मुंबईत लिटरमागे पेट्रोलचा दर १११.३० रुपये व डिझेलचा दर ९७.२२ रुपये ठेवावा असे स्पष्ट म्हटले होते, याकडे चांडक यांनी लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *