आषाढी एकादशीचे वेध : माउलींचे मानाचे अश्व 18 जूनला पुण्यात येणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ मे । कोरोना संकट निवळल्यामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर आषाढी वारीचा सोहळा यंदा हरिनामाच्या गजरात पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. या प्रस्थानाचे मानकरी मानले जाणारे माउलींचे मानाचे अश्वद्वय ‘हिरा-मोती’ अंकली येथून १० जून रोजी पुण्याकडे वाटचाल सुरू करणार आहेत. ११ दिवसांचा पायी प्रवास करून मानाच्या अश्वांचा लवाजमा १८ जून रोजी रात्री पुण्यात पोहोचणार आहे. विश्रांतीसाठी एक दिवस मुक्काम करून मानाचे अश्व माउलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी २० जून रोजी आळंदीला प्रयाण करतील, अशी माहिती अंकली संस्थानचे ऊर्जितसिंहराजे शितोळे सरकार आणि महादजीराजे शितोळे यांनी दिली.

बेळगावजवळच्या अंकली येथील शितोळे सरकारांच्या अश्वांना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या अग्रस्थानाचा मान आहे. दरवर्षी पालखी सोहळ्याच्या १२ दिवस अगोदर मानाचे अश्वद्वय अंकली येथून प्रस्थान करतात आणि अंकली ते आळंदी हा सुमारे ३१५ किलोमीटरचा मार्ग पायी पार करतात. हिरा आणि मोती अशी माउलींच्या मानाच्या अश्वांची नावे आहेत. त्यांच्यासोबत जरीपटका आणि गादी असतात. अश्वांसह त्यांचेही पूजन केले जाते. त्यानंतर गादी अश्वांवर चढवली जाते. मानाचा जरीपटका स्वाराकडे सांभाळण्यासाठी सुपूर्द केला जातो, असे शितोळे सरकार यांनी या वेळी बोलताना सांगितले.

स्वारांचीही परंपरा
माउलींच्या मानाच्या अश्वांसाठीचे स्वारही वारी सोहळ्यात लक्ष वेधून घेतात. पारंपरिक पोशाखात ते आरूढ होतात. एक अश्व स्वाराचा तर एक माउलींचा असतो. तुकाराम कोळी हे स्वार सलग २४ वर्षे सोहळ्यासोबत जात आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान होणाऱ्या गोल आणि उभ्या रिंगणाच्या वेळी स्वारांचे कौशल्य दिसून येते. एकूणच यंदाच्या वर्षी आषाढी वारी मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *