महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ मे । दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात बदललेल्या वातावरणामुळे पिकांची नासाडी सुरू झाली आहे. एकीकडे कांदा आवक अधिक असल्याने दरात घसरण झाली आहे. दुसरीकडे टोमॅटोची ७० टक्के आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात दरात वाढ झाली आहे. त्यामुळे कांदा पिकात शेतकऱ्यांना तर टोमॅटोमध्ये ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे. गुरुवारी बाजार समितीत टोमॅटोची आवक कमी हाेती. प्रति क्रेट ८०० ते ९०० रुपये दर मिळाला. किरकोळ बाजारात ७० ते ८० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.
कर्नाटक, तामिळनाडूत पावसामुळे टोमॅटोचे नुकसान झाले. नगर, पुणे परिसरासह जिल्ह्यातील टोमॅटो ढगाळ हवामान आणि वेगवान वाऱ्यामुळे खराब होत आहे. बाजार समितीत टोमॅटोची आवक घसरली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने तेजी निर्माण झाली आहे. सिन्नर, निफाड, दिंडोरी आणि त्र्यंबकमध्ये लागवडीला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मान्सूनपूर्व पावसाचा इशारा दिला असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. एकीकडे खरीप हंगामासाठी शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. टोमॅटोसारख्या पिकाला अतिपाऊस किंवा वेगाचा वारा अनुकूल नसतो. किरकोळ बाजारातील वाढत्या दरामुळे व्यवसायावर परिणाम झाला असून ग्राहकांनी खरेदी कमी केली आहे.