अविनाश भोसलेंना आज न्यायालयात हजर करणार ; सीबीआयकडून अटक

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ मे । डीएचएफएल आणि येस बँकेतील तीन हजार कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगप्रकरणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने गुरुवारी मुंबईत अटक केली. शुक्रवारी भोसले यांना सीबीआय न्यायालयात हजर केले जाणार आहे. याचप्रकरणी २८ एप्रिल रोजी मुंबईस्थित बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया यांनादेखील सीबीआयने अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून अविनाश भोसले यांचे नाव पुढे आल्यानंतर ही अटकेची कारवाई केल्याची माहिती सीबीआयमधील सूत्रांनी दिली.

संजय छाब्रिया यांच्या अटकेनंतर झालेल्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनंतर, याप्रकरणी ३० एप्रिल रोजी सीबीआयच्या पथकाने अविनाश भोसले यांच्यासह बांधकाम व्यावसायिक शाहिद बलवा तसेच विनोद गोएंका यांच्या मुंबई व पुण्यातील घर तसेच कार्यालय अशा आठ ठिकाणी छापे टाकले होते.

येस बँकेने डीएचएफएलमध्ये गुंतविलेल्या पैशांद्वारे डीएचएफएलने जे कर्ज बांधकाम कंपन्यांना दिले होते, त्यामध्ये अविनाश भोसले यांच्या कंपनीचादेखील समावेश असल्याची माहिती आहे. तसेच, या घोटाळ्यातील पैसा मुंबईसह राज्यातील काही प्रमुख बांधकाम व्यावसायिकांच्या कंपन्यांच्यामार्फत वळविण्यात आल्याचा संशय सीबीआयच्या अधिकाऱ्यांना आहे.

# रिक्षाचालक ते देशातील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे.
# अविनाश भोसले हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरचे. नोकरीच्या शोधात पुण्यात आले. पुण्यातील रास्ता पेठेत भाड्याच्या घरात राहू लागले.
# गुजराण करण्यासाठी रिक्षा चालवायला सुरूवात केली. त्यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला होते. या माध्यमातून त्यांची बांधकाम क्षेत्रातील लोकांशी ओळख झाली.
# सुरूवातीला रस्त्याची छोटी-मोठी कंत्राटे ते घेऊ लागले. त्यानंतर त्यांनी आपल्या व्यवसायात झेप घेतली.

यापूर्वीही झाली होती कारवाई
# अविनाश भोसले यांच्यावर ईडीनं गेल्यावर्षी जूनमध्ये कारवाई करीत ४० कोटींची संपत्ती जप्त केली होती.
# त्यानंतर मनीलॉन्ड्रिंग प्रकरणात ९ ऑगस्ट रोजी पुण्यातील ४ कोटींची एक मालमत्ता ताब्यात घेतली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *