महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ मे । मंगळवारी पेट्रोल डिझेल पंप डिलर्सचा संप आहे. महाराष्ट्रासह इतरही राज्यात पेट्रोल डिझेल पंप डिलर्सनं संपाची हाक दिली आहे. कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी हा संप आहे. आज पेट्रोल डिझेलची खरेदी न करण्याचा निर्णय डिलर्सनी घेतला आहे. (Petrol Diesel Price todays rates )
2017 पासून कमिशनमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही अशी तक्रार करत त्यांनी हा संप पुकारला आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी पेट्रोल डिझेलवरील करात कपात केली, रातोरात इंधनदरही कमी केले. पण, असं केल्याने पेट्रोल पंप धारकांना आर्थिक फटका बसला आहे.
जास्त किंमतीने स्टॉक विकत घेतल्यानंतर आता कमी दरात विकावा लागत असल्याने त्यांचं आर्थिक नुकसान होणार असल्याचं डिलर्सचं म्हणणं आहे. असं असलं तरीही संपाचा थेट सामान्यांना फटका बसणार नाही अशी हमीही देण्यात आली आहे. जोवर साठवलेलं इंधन आहे, तोवर पंपावर इंधन विक्री सुरूच राहणार आहे. पण, कोणत्या पंपावर इंधन संपलं, तर मात्र अडचणीचा सामना करावा लागू शकतो.