ताशी १०० किलोमीटर वेगाने वारे, जामा मशिदीचे घुमट कोसळले; दिल्लीत पावसाचा कहर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ मे । दिल्लीत सोमवारी वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. (delhi heavy rain)

मध्य दिल्लीतील जामा मशीदीसह परिसरातील इतर वास्तूचेही नुकसान झाले आहे. तर, शहरातील अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर, घराच्या गच्चीचा भाग अंगावर कोसळल्याने एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. अंगूरी बाग परिसरात पिंपळाचे झाड अंगावर पडल्याने बशीर बाबा नावाच्या ६५ वर्षीय व्यक्तीला प्राण गमवावे लागले. दिल्लीत सोमवारी सायंकाळी ताशी १०० किलोमीटर वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली.

जामा मशिदीच्या मुख्य घुमटावरील कलश कोसळल्याचे मशिदीचे शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांनी म्हटलं आहे. कळसाचे वजन जवळपास ३०० किलो आहे. पुन्हा त्या ठिकाणी तो कळस बसवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. मशिदीचे नुकसान झाल्यानंतर दिल्लीतील वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी एक पथक पाहणीसाठी पाठवले आहे. तसंच, मशिदीचे झालेले नुकसान पाहता तातडीने दुरुस्तीसाठी पंतप्रधानांना पत्र लिहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दिल्लीत सोमवारी रात्री झालेल्या वादळी पावसाचा विमानांना फटका बसला आहे. कमीत कमी ४० विमानांनी उशीराने उड्डाण केलं. हवामान विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत संध्याकाळी साडे पाचपर्यंत १७.८ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *