महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई : देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या रविवारीच ९००० पर्यंत पोहोचली आहे. तर, मृतांची संख्या ३०० इतकी झाली आहे. केवळ रविवारी ७६३ रुग्ण वाढले असून ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला असून दिल्लीत देखील ५ लोकांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात रुग्णसंख्या २००० वर, महाराष्ट्रात २२१ नवे रुग्ण आढळले असून २२ लोकांचा मृत्यू झाला आहे. एखाद्या राज्यात करोनाने मृत्यू होण्याचे हे प्रमाण देशातील कोणत्याही राज्यांमधील मृत्यूच्या प्रमाणाहून अधिक आहे.
रविवारी रात्री उशिरा देशातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या वाढून ती ९,१८८ वर पोहोचली आहे. यात ७६३ नवे रुग्ण आहेत, तर मृत्यू पावलेल्यांची संख्या ३२९ वर पोहोचली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-१९ चा संसर्ग आता देशातील ३५० जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. हा देशाचा ५० टक्के इतका भाग आहे. ६ एप्रिल या दिवशी देशात सुमारे ४७०० रुग्ण होते. तर गेल्या ६ दिवसांमध्ये ही संख्या दुप्पट झाली आहे. काही दिवसांपूर्वी ४.२ दिवसांमध्ये रुग्ण संख्या दुप्पट होईल असे सांगितले जात होते. त्यानुसार रुग्णसंख्या दुप्पट होण्याची गती काहीशी कमी झाल्याचे दिसत आहे.