देशासह महाराष्ट्रात मंकीपॉक्सचा धोका किती?; आरोग्यमंत्री म्हणतात…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । महाराष्ट्रासह देशात सध्या मंकीपॉक्सचा एकही रुग्ण नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. त्यामुळे मंकीपॉक्सचे भय मनात ठेवण्याचे कारण नसून, प्रशासन योग्य ती सर्व खबरदारी घेत असल्याचे टोपे यांनी यावेळी नमूद केले. खबरदारीचा उपाय म्हणून परदेशातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा जनता दरबार बुधवारी पक्ष कार्यालयात पार पडला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी टोपे म्हणाले की, सध्या राज्यात मुंबई आणि पुणे येथे करोनारुग्णांचे प्रमाण जास्त आहेत. एकूण साडेतीन हजाराच्या आसपास उपचाराधीन रुग्ण राज्यामध्ये आहेत. त्यातील अडीच हजार रुग्ण हे एकट्या मुंबईमध्ये आहेत. रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याच्या संख्येमध्ये मात्र वाढ दिसत नाही. तसेच रुग्णालयांमध्ये रुग्णांची भरती मोठ्या प्रमाणात होत नसल्याने सध्यातरी जम्बो कोविड सेंटरची आवश्यकता नसल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली.

पावसाळ्यात साथीचे रोग वाढतात, कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी पाणी साचलेले दिसते. त्या साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते. ज्या ठिकाणी स्वच्छ पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे, तेथील नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, अशा सूचना आरोग्य विभागातून नेहमीच दिल्या जातात, असेही राजेश टोपे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *