महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । गेल्या आठ दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. विशेषत: मुंबईत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मुंबई पालिका क्षेत्रात दैनंदिन ५० पर्यंत आलेली रुग्णसंख्या ५०० च्या पुढे गेली आहे. राज्यात बुधवारी ( १ जून) १०८१ नव्या रुग्णांची नोंद झाली. यापैकी तब्बल ७३९ रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत.
कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून बुधवारी नवे निर्देश जारी झाले आहेत. यामध्ये कोरोना चाचण्यांत वाढ करणे, वॉर्डरूम सक्रिय करणे तसेच जंबो कोविड सेंटर्स उघडण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. मंगळवारी मुंबईत ५०६ नव्या रुग्णांची भर पडली होती. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी कालावधी २ हजार ३५५ इतका झाला आहे. राज्यात गेल्या आठ दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढ दुप्पट झाली आहे. गेल्या बुधवारी २५ मे रोजी ४७० नव्या रुग्णांची नोंद झाली होती. १ जून रोजी नव्या रुग्णांची संख्या १ हजार ८१ नोंदली गेली. सुदैवाने बरे होणाऱ्यांचे प्रमाण चांगले असून बुधवारी ५२४ रुग्णांना सुटी देण्यात आली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, बूस्टर डोस घ्या
– ज्यांनी कोरोनो प्रतिबंधक लस घेतली आहे आणि ९ महिने पूर्ण झाले असतील तर त्यांनी बूस्टर डोस घेतला पाहिजे. खासगी रुग्णालयात बूस्टर डोस अल्प किमतीत आहेत. हे ऐच्छिक आहे, पण यामुळे तुम्ही सुरक्षित होऊ शकाल.
– कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोठ्या संख्येने झाले आहे, त्यामुळे कोरोना आजाराचा मोठा प्रभाव आता दिसत नाही. मुंबई महानगर क्षेत्रातल्या नागरिकांनी बूस्टर जरूर घेतला पाहिजे.
पूर्ण नव्या व्हेरीएंटशिवाय लाटेची शक्यता नाही : तोवर संसर्गाच्या नव्या लाटेची भीती बाळगू नये. प्रमाण वाढले असले तरी बहुसंख्य रुग्ण सौम्य लक्षणे असणारे आहेत. अनेकांना कुठलीच लक्षणे नाहीत. अगदी हळूहळू का होईना पण राज्यात बाधितांची संख्या वाढत असल्याने सर्व नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः ज्यांचे वय अधिक आहे, ज्यांना जोखमीचे किंवा तीव्र स्वरुपाचे दुखणे आहे, अशा लोकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.