महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जून । राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.७) मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी मास्क सक्तीबाबत सध्या कुठलाही निर्णय झाला नसल्याचे सांगितले.
टोपे म्हणाले की, कोविडबाबत प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागामार्फत संपूर्ण माहिती दिली जाते. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी वाढल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सहा जिल्ह्यांमध्ये ८ टक्के, ६ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे. ही या जिल्ह्यांपुरतीच वस्तुस्थिती आहे. पण यामध्ये केवळ १ टक्केच रुग्णांना रुग्णालयांत अॅडमिट करावे लागत आहे. त्यामुळे काळजीचा विषय आजिबात नाही, असेही टोपे म्हणाले. मास्कची सक्ती नसली तरी त्याची अंमलबजावणी व्हावी, असे आवाहन केले आहे, असे ते म्हणाले.
काळजी घेऊन वारी होणार
टोपे म्हणाले, आषाढी वारी संदर्भातही चर्चा झाली. वारीमध्ये १०-१५ लाख लोक येतील. अशा परिस्थितीत काळजी घेऊन ही वारी पूर्ण करावी, अशी प्रामुख्याने चर्चा झाली आहे. वारीची तयारी पुढे गेलेली आहे. यामागे लोकांच्या भावना आहेत, त्यामुळे वारी होईल.