महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जून । छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. या मालिकेत ‘तारक मेहता’ साकारणारे अभिनेता शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी हा शो सोडल्याची चर्चा सुरु आहे. तर, दुसरीकडे ‘बबिता’ साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) देखील मालिकेचा निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या सगळ्या चर्चा सुरु असतानाच मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक कलाकार मालिका सोडण्याच्या वाटेवर असताना आता मालिकेत ‘दया बेन’ची (Daya Ben) वापसी होणार आहे.
नुकत्याच रिलीज झालेल्या एका प्रोमोमधून चाहत्यांना ही आनंदाची बातमी देण्यात आली आहे. या प्रोमोत ‘दया बेन’ लवकरच ‘गोकुळधाम सोसायटी’मध्ये येणार असल्याचे बोलले गेले आहे. शोमध्ये ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर येणार आहे. आता पुन्हा दयाबेनची पावले गोकुळधाममध्ये पडणार असून, गरबा क्वीन मालिकेत परतणार आहे.