वारी २०२२ ; टाळ मृदुंगाच्या गजरात हिरा मोती अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ जून । गेली सलग दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे संतांचा पायी वारी पालखी सोहळा संपन्न झाला नव्हता. यंदा मात्र पायी वारी पालखी सोहळा पार पडणार आहे. संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अंकली जिल्हा बेळगाव इथून श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या हिरा आणि मोती या दोन अश्‍वांनी आज श्री क्षेत्र आळंदी कडे प्रस्थान ठेवलं.

कोरोना नंतर पहिल्यांदाच पायी वारी पालखी सोहळा होत असल्यामुळे शितोळे सरकार यांनी समाधान व्यक्त केलं आहे. त्याच बरोबर पायी वारी पालखी सोहळ्यात कोणत्याही वारकऱ्याला कोणताही आजार होऊ नये अशी प्रार्थना देखील ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांनी माऊली कडे केली.

अंकली गावातील राजवाड्यातून श्रींच्या अश्वांचे हरीनाम गजरात प्रस्थान झाल्यानंतर अंकली नगर प्रदक्षिणा आणि महाप्रसाद झाल्यावर मांजरीवाडी-कागवाड मार्गे हा सोहळा म्हैसाळकडे मार्गस्थ झाला. अश्वांचा पहिला मुक्काम मिरज इथं आहे. 11 तारखेला सांगली, सांगलवाडी मुक्काम, 12 तारखेला तुंग, मिरजवाडी, इस्लामपूर, पेठनाका मुक्काम, 13 तारखेला नेर्ले मार्गे वाहगाव मुक्काम, 14 तारखेला उंब्रज मार्गे भरतगाव मुक्काम, 15 तारखेला सातारा, नागेवाडी, भुइंज मुक्काम, 16 तारखेला सुरुर, खंडाळा, सारोळा मुक्काम, 17 तारखेला हरिश्चंद्री, वरिये मार्गे शिंदेवाडी मुक्काम आणि 18-19 जूनला दोन दिवसांचा पुणे मुक्काम होणार आहे.

अश्व आळंदीत सोमवार 20 जूनला दाखल होणार आहेत. अश्व आल्यानंतर आळंदीच्या वेशीवर अश्वांचे परंपरेप्रमाणे सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार आणि आळंदी देवस्थानच्यावतीने स्वागत करण्यात येणार आहे. तत्पूर्वी पुणे आळंदी मार्गावरील श्रीकृष्ण मंदिरात (बिडकर वाडा) सरदार हरप्रीतसिंह बिडकर परिवाराच्या वतीने अश्वांचं स्वागत होणार आहे.

या अश्व प्रस्थान सोहळ्यास श्रीमंत उर्जितसिंह शितोळे, महादजी शितोळे, हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब आरफळकर, ज्ञानेश्वर गुंळुजकर, निवृत्ती चव्हाण, राहुल भोर, अजित परकाळे, विजय परकाळे, अतुल वाल्हेकर यांच्यासह वारकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *