निवडणूक केवळ लढवण्यासाठी नाही, तर..; माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ जून । राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेच्या (Shiv Sena) संजय पवार यांचा पराभव करत भाजप उमेदवार धनंजय महाडिक (Dhanjanya Mahadik) यांनी विजय मिळवलाय. या विजयानंतर भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र म्हणजे शिवसेना नव्हे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय, असं म्हणत शिवसेनेवर हल्लाबोल केला.

तसंच निवडणुकीत भाजपसाठी काहीसा अशक्यप्राय वाटणारा विजय खेचून आणल्यानंतर फडणवीसांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जखमेवर अक्षरश: मीठ चोळलं. राज्यसभा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आला. त्यांनी शिवसेनेच्या पहिल्या उमदेवारापेक्षा म्हणजे संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मतं घेतली, हे देवेंद्र फडणवीसांनी मुद्दामून जोर देऊन सांगितलं.

फडणवीस पुढं म्हणाले, ‘आमच्या सगळ्यांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार याठिकाणी विजयी झाले आहेत. सगळ्यात आधी हा विजय आहे तो मी आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप यांना आणि मुक्ता टिळक यांना समर्पित करतो. दोन्ही आमदार आजारी असूनही मतदानासाठी आले. लक्ष्मण जगताप अॅम्ब्युलन्समधून मोठा प्रवास करून ते इथपर्यंत आले. माझ्या पक्षासाठी मी येणारच असं ते म्हणाले होते आणि ते आले. त्यांचे मी आभार मानतो. मुक्ता टिळक यांचेही आभार मानतो. हा विजय हा सर्वार्थानं महत्वाचा आहे.’

‘निवडणुकीत पियुष गोयल यांना सर्वाधिक 48 मतं, अनिल बोंडे यांनाही 48 मतं मिळाली आहेत. आमचा तिसरा उमेदवारही शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मतं घेऊन निवडणून आलाय. आज भाजपची ताकद बघायला मिळाली.’ दरम्यान, फडणवीसांनी ट्विटमध्ये लिहिलंय.. निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती.. जय महाराष्ट्र! असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवरही जोरदार निशाणा साधलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *