महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।दि.११ जून । सध्या मेसेजसाठी व्हाट्सअप लोकप्रिय आहे. पण टेलिग्रामनेही लवकरच लोकप्रियता मिळवत आपले युजर्स वाढवले आहेत. मागच्या दोन वर्षात टेलिग्रामच्या युजर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. सध्या टेलिग्राम ग्राहकांना फ्री सेवा देत आहे पण लवकरच टेलिग्राम ‘पेड व्हर्जन’ बाजारात आणणार आहे. सध्या या तंत्रज्ञानावर काम सुरू असल्याचं टेलिग्रामचे संस्थापक पॅवेल ड्युरो यांनी सांगितलं आहे.
या व्हर्जननुसार युजर्सना अधिक क्षमतेच्या फाईल्स शेअर करता येणार आहेत. त्याचबरोबर मीडिया आणि स्टिकरचा पण आनंद घेता येणार आहे. तसेच जे पेड व्हर्जनचा लाभ घेणार नाहीत त्यांनाही याचा काही प्रमाणात फायदा होणार आहे. पण त्यामुळे टेलिग्रामच्या मोफत फाईल्स शेअर्स सेवेला आता चाप बसणार आहे.
“आमच्या सर्वात जास्त मागणी असलेल्या चाहत्यांना आमची वैशिष्ट्ये विनामूल्य ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या वाढलेल्या मर्यादांना सशुल्क पर्याय बनवणे.” असं कंपनीच्या संस्थापकांनी सांगितलं आहे.
टेलिग्राम पेड व्हर्जन का लाँच करत आहे?
संस्थापक पॅवेल ड्युरो यांनी सांगितलं की, ग्राहकांना सध्या नव्या फीचर्सची आवश्यकता आहे. “जर आपण सर्व लिमिट काढून टाकल्या तर आपले सर्वर आणि ट्राफिक व्यवस्थापन करायला अडचणी निर्माण होतील” असं पॅवेल ड्युरो यांनी सांगितलं आहे. त्यासाठी पेड व्हर्जन लाँच करण्याचा निर्णय टेलिग्रामने घेतला आहे.
टेलिग्राम प्रिमिअम काय आहे?
यामध्ये मासिक सबस्क्रिप्शन प्लॅन असणार आहे. त्याद्वारे ग्राहकांना कंपनीने लाँच केलेल्या नव्या फीचर्सचा आनंद घेता येणार आहे. यासाठी ग्राहकांना नव्या फीचर्सचा पहिल्यांदा आनंद घेण्यासाठी टेलिग्रामला सपोर्ट आणि क्लबला जॉईन व्हावं लागणार आहे.
फ्री युजर्सचं काय होणार ?
टेलिग्रामसाठी पेड व्हर्जन आल्यानंतर फ्री ग्राहकांनाही नव्या व्हर्जनचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठीही नवे व्हर्जन आणले जाणार असल्याचं संस्थापक पॅवेल ड्युरो यांनी सांगितलं आहे. ज्या ग्राहकांनी अजून पेड सबस्क्रिप्शन घेतलं नाही त्यांनाही काही योजनांचा फायदा घेता येणार आहे. त्यामध्ये प्रिमिअम ग्राहकांनी शेअर केलेल्या मोठ्या साईजच्या फाईल्स, मीडिया आणि स्टिकर्स डाऊनलोड करता येणार आहेत. असं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान या महिन्यात टेलिग्रामचे नवे फीचर्स येण्याची शक्यता आहे. पण यासाठी किती पैसे मोजावे लागणार आहेत याची अधिकृत माहिती अजून कंपनीकडून देण्यात आलेली नाही.