महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ जून । भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन (Corona Active Cases In India) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून येत असून, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 8,329 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे 10 टक्क्यांनी वाढले आहे. 7 जून रोजी देशात दैनंदिन रुग्णांची संख्या पाच हजारांच्या पुढे होती, आता ही संख्या आठ हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. (Corona India Active Cases Update News)
दिवसागणिक वाढत जाणाऱ्या आकडेवारीनंतर देशातील कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या आता 40,370 वर पोहोचली असून, गेल्या चोवीस तासांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 0.09 टक्के आहे, तर कोविड-19 मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.69 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. देशातील कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर 2.41 टक्के आणि साप्ताहिक संसर्ग दर 1.75 टक्के इतका नोंदवला गेला आहे.
गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, गेल्या 24 तासांत राज्यात 3,081 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 1323 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज राज्यात शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील सक्रिय रूग्णांची संख्या 13,329 इतकी नोंदवण्यात आली आहेत.
राज्यतील रुग्ण बरे होण्याचा दर 97.96 टकके झाला असून, मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक 9,191 सक्रिय रूग्ण मुंबईत नोंदवण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ ठाण्याचा नंबर असून, येथे 2,157 सक्रिय रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पुण्याचा नंबर असून, येथे 884 कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.