विधान परिषदेच्या निवडणुकीत गाफील राहू नका, अपक्ष आमदारांच्या अपेक्षा पूर्ण करा ; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ जून । राज्यसभा निवडणुकीतील अनुभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सतर्क झाले आहेत. शिवसेनेचे राज्यसभा उमेदवार संजय पवार यांच्या पराभवाच्या संशयाची सुई राष्ट्रवादीकडेही गेली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत गाफील राहू नका, अपक्ष आमदारांच्या अपेक्षा पूर्ण करा, अशी तंबी पवार यांनी आपल्या ज्येष्ठ मंत्र्यांना दिली आहे.

विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज घेण्याचा सोमवार (ता. १३) हा शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर पवार यांनी सिल्व्हर ओक या निवासस्थानी ज्येष्ठ मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली होती. अपक्ष पण राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार संजयमामा शिंदे आणि देवेंद्र भुयार या दोघांची मते फुटल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर २० जून रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला दगाफटका होऊ नये याची काळजी घेण्याचे आदेश पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिल्याचे कळते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कोणी कोणत्या आमदारांशी संपर्क करायचा, अपक्षांच्या मतदारसंघातील कोणती प्रलंबित कामे मार्गी लावायची, अपक्षांना आणखी किती निधीची अपेक्षा आहे याची माहिती गोळा करून अपक्षांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, असेही पवार यांनी सांगितल्याचे समजते. परिषद निवडणुकीत आघाडीचा एक उमेदवार पराभूत होणार आहे. त्यात राष्ट्रवादीचा उमेदवार असू नये याची पवार खबरदारी घेताहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *