महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ जून । नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधींची सलग तिसऱ्या दिवशी ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना उलट सुलट प्रश्न विचारले. सलग तीन दिवस सतत प्रदीर्घ चौकशी सुरू असल्याने राहुल गांधी यांनी विश्रांतीसाठी वेळ मागितला आहे. (Rahul Gandhi ED Inquiry)
राहुल गांधींची ईडीची चौकशी नॅशनल हेराल्डची (National Herald Case) मालकी असलेल्या काँग्रेसने प्रवर्तित यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडमधील कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित आहे. हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडद्वारे (AJL) प्रकाशित केले जाते आणि यंग इंडियनच्या मालकीचे आहे. याच प्रकरणात गांधींची चौकशी सुरू आहे. प्रदीर्घ चौकशीनंतर सुट्टी देण्याची विनंती राहुल गांधींनी केली.
ईडीने देखील त्यांची ही विनंती मान्य केली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची आज चौकशी होणार नसून त्यांना शुक्रवारी पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले आहे. तिसऱ्या दिवशी गांधी यांची 13 तासांहून अधिक वेळ चौकशी झाली. त्यानंतर साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.