महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ जून । रस्त्यावर नियमभंग करून, चुकीच्या पध्दतीने पार्किंग केलेल्या वाहनाचे छायाचित्र काढून पाठवा व ५०० रूपयांचे रोख इनाम मिळवा, ही घोषणा आहे केंद्रीय रस्ते- महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची. अशी बेशिस्त करणाऱया वाहनचालकांना १००० रूपये दंड करण्याचीही तंबी त्यांनी दिली. दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी, वाहनांची बेसुमार संख्या व नियमांचा भंग करण्याची सर्रास प्रवृत्ती यावर फटकेबाजी केली.
गडकरी यांनी बेशिस्त पार्किंग करणाऱयांबाबत रोख रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे. मात्र आता त्यांच्या मंत्रालयाच्या आसपासच्या रस्त्यांवर पार्किंग च्या नियमांची एशीतैशी करून अगदी फूटपाथवरही बिनदिक्कत लावलेल्या अनेक वाहनांची छायाचित्रे मंत्रालयाकडे पाठवून ५००-५०० रूपये मिळविण्याची पहिली नामी संधी संसद मार्ग, रफी मार्ग, विठ्ठलभाई पटेल हाऊस, पटेल चौक परिसरातील लोकांना मिळाल्याची चर्चा आहे. नियम तोडून रस्त्यांवर पार्किंग करणाऱया वाहनचालकची ही प्रवृत्ती रोखण्यासाठी १००० रूपये दंड करण्याबाबत आपले मंत्रालय लवकरच कायदा आणण्याचाही विचार करत असल्याचे गडकरी म्हणाले. इमारती बांधताना पार्किंगसाठी पुरेशी जागा न ठेवणे खेदकारक असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की पार्किंगच्या जागेचा अभावामुळे लोक रस्त्यांवरच वाहने उभी करतात.
लोकांना आजकाल गाड्यांचा किती सोस झाला आहे याचे उदाहरण देताना गडकरी म्हणाले की नागपूरला माझ्याकडे स्वयंपाक करणाऱयाकडे २-२ सेकंड हॅंड गाड्या आहेत. चार जणांच्या कुटुंबात आज ६ कार असतात. दिल्लीचे लोक त्यातल्या त्यात भाग्यवान की त्यांची वाहने उभी करण्यासाठी अनेक ठिकाणी वेगळ्या जागा आहेत. मात्र गडकरी यांना त्यांच्या मंत्रालयासमोरचे दृश्य आठवले नसावे असेही बोलले जाते. नवीन संसदेचे काम सुरू नव्हते तेव्हापासूनच परिवहन भवनासमोरही थेट रस्त्यावरच वाहने उभी केली जातात.