मान्सूनची कोकणाकडे पाठ ; बळीराजावर दुबार पेरणीचे संकट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ जून । गेल्यावर्षी जून महिन्यात धो धो कोसळणाऱ्या पावसाने यंदा मात्र कोकणाकडे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्यात विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसाने पेरणी केलेल्या शेतांमध्ये रुजवा झाला मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने शेतात झालेला रुजवा कोमेजू लागल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. आणखी एक दोन दिवस पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.

यावर्षी मार्च महिन्यापासूनच कोकणातील वातावरणात प्रचंड उष्मा निर्माण झाला होता. मे महिन्यात तर आतापर्यंतच्या सर्व तापमानाचे रेकॉर्ड मोडीत निघाले होते. उकाड्याने हैराण झालेले नागरिक पावसाची अतूरनेते वाट पहात होते. गेल्यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने यंदा मात्र 10 जून पर्यंत प्रतीक्षा करायला लावली. 10 जूनला विजांच्या कडकडाटासह मान्सूनचे आगामन झाले आणि उष्माने हैराण झालेले नागिरक सुखावले, आता सुरु झालेला पाऊस पुढे असाच सुरु राहिल अशी अपेक्षा होती मात्र दोन दिवस बरसणाऱ्या पावसाने अचानक दडी मारली आणि वातावरणात पुन्हा कमालीचा उष्मा निर्माण झाला. दोन दिवस झालेल्या पावसाने पेरणी केलेल्या शेतांमध्ये रुजवा केला मात्र त्यांनतर रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला पाऊस न पडल्यामुळे शेतातील रोपे कोमेजून जाऊ लागली आहेत.

पाऊस लांबल्यामुळे ग्रामीण भागात पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात कोरड्या झालेल्या नद्या, सार्वजनिक पाणवठे अद्याप कोरडेच आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणी टंचाई अद्याप संपलेली नाही. गेल्यावर्षी जुन 15 अखेर 343 मी मी इतका पाऊस पडला होता. मात्र यावर्षी केवळ 66 मी मी इतकाच पाऊस झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा केवळ 20 टक्के इतकाच पाऊस पडला आहे. पावसाने दडी मारल्याने शेतीच्या कामांना खीळ बसली आहे. येत्या एक दोन दिवसात पाऊस बरसला नाही तर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *