निकाल लागला ! ‘हे’ आहेत 10वी नंतरचे बेस्ट करिअर ऑप्शन्स

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ जून । गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे दहावी आणि बारावी स्टेट बोर्डाचे निकाल. अखेर आज म्हणजेच 17 जूनला 2022 ला स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra state board 10th Result 2022) जाहीर झाला आहे. यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रचंड टेन्शन आलं आहे.आज दुपारी एक वाजता हा निकाल तुम्ही ऑनलाईन जाहीर झाला आहे. मात्र ’10वी नंतर पुढे काय?’ हा करिअरच्या संदर्भातला सर्वांत मोठा प्रश्न बहुतांश विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही हा प्रश्न पडतो. आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी कोणता विषय किंवा कोणती शाखा योग्य ठरेल, या संभ्रमामध्ये पालक असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दहावीनंतरचे बेस्ट करिअर ऑप्शन्स सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या . 

पॉलिटेक्निक कोर्स
दहावीनंतर विद्यार्थी मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल, कॉम्प्युटर, ऑटोमोबाइल अशा पॉलिटेक्निक (Polytechnic) अभ्यासक्रमांची निवड करू शकतात. यामध्ये महाविद्यालयं 3 वर्षं, 2 वर्षं आणि एका वर्षाचे पदविका अभ्यासक्रम चालवतात. या डिप्लोमा कोर्सचा फायदा म्हणजे, कमी काळात सर्वसाधारण पगाराच्या नोकऱ्या सहज मिळतात. पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्या, सरकारी क्षेत्रातल्या नोकऱ्या, उच्च शिक्षण, स्वतःचा व्यवसाय यांसारखे अनेक पर्याय (Career Options) उपलब्ध आहेत.

विज्ञान (Science)
सध्याच्या काळात पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये हा ऑप्शन सर्वांत जास्त लोकप्रिय आहे. विज्ञान शाखा निवडण्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे बारावीनंतर तुम्ही इच्छा असल्यास वाणिज्य (Commerce) किंवा कला (Arts) शाखेमध्येही जाऊ शकता. विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र हे मुख्य विषय असतात; पण अनेक विद्यार्थ्यांना गणित आवडत नाही किंवा तुम्हाला जर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर तुम्ही गणित वगळता इतर विषयांची निवड करू शकता. बारावीनंतर विज्ञान शाखेतल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इंजिनीअरिंग, मेडिकल, रिसर्च अशा क्षेत्रांमध्ये विज्ञान शाखेचे विद्यार्थी करिअर करू शकतात. या विद्यार्थ्यांना बीटेक, बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (MBBS), बॅचलर ऑफ फार्मसी, बॅचलर ऑफ मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, बीएस्सी होम सायन्स किंवा फॉरेन्सिक सायन्स अशा पदव्या मिळवता येतात.

वाणिज्य (Commerce)
विज्ञान शाखेनंतर वाणिज्य हा दुसरा सर्वांत लोकप्रिय करिअर पर्याय आहे. ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्हाला अर्थशास्त्र आवडत असेल तर वाणिज्य शाखेमध्ये तुम्ही चांगली कामगिरी कराल. यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट, एमबीए, बँकिंग क्षेत्रात गुंतवणूक असे करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत. या क्षेत्रांमध्ये जाण्यासाठी तुम्हाला अकाउंटन्सी, फायनान्स आणि इकॉनॉमिक्सची माहिती असली पाहिजे. वाणिज्य शाखेतल्या विद्यार्थ्यांना हेच शिकवलं जातं. वाणिज्य शाखेत शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंटंट, बिझनेस मॅनेजमेंट, अ‍ॅडव्हर्टायझिंग अँड सेल्स मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अशा क्षेत्रांत संधी उपलब्ध होतात.

आर्ट्स (Arts)
ज्या विद्यार्थ्यांना अ‍ॅकॅडमिक रिसर्चमध्ये आवड आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी कला शाखा हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही सर्जनशील असाल तर कला शाखा हा तुमच्यासाठी योग्य मार्ग आहे. कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल हे मुख्य विषय असतात. प्रॉडक्ट डिझायनिंग (Product Designing), मीडिया आणि जर्नालिझम (Media/Jurnalism), फॅशन टेक्नॉलॉजी (Fashion Technology), व्हिडिओ क्रिएशन आणि एडिटिंग (Video Creation and Editing) आणि एच आर ट्रेनिंग, स्कूल टीचिंग असे किती तरी पर्याय कला शाखेतल्या विद्यार्थ्यांना निवडता येतात.

आवडीच्या करिअरची निवडीसाठी योग्य अभ्यासक्रमाची निवड करणं हा आयुष्यातला सर्वांत महत्त्वाचा निर्णय असतो. योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय कमी वेळेत यश मिळवण्यास मदत करतो. त्यामुळं दहावीनंतर अभ्यासक्रमाची काळजीपूर्वक निवड करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *