महाराष्ट्रात या निकालाचा गाजावाजा ; पुण्याच्या पठ्ठ्याचा अनोखा प्रताप ; प्रत्येक विषयात 35 मार्क

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ जून । राज्यात आज दहावीचा (SSC result 2022) निकाल जाहीर झाला आहे. दहावीच्या परीक्षेत यावर्षी लाखो विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) लाखो घरांमध्ये आज उत्साहाचं वातावरण आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालक आनंदात आहेत. ते आनंदाने पेढे वाटत आहेत. शेकडो शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. विशेष म्हणजे राज्याचा दहावीचा निकाल हा 96.47 टक्के लागला आहे. अनेक विद्यार्थ्यांना 80 आणि 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. त्यामुळे राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यंदा दहावीत अक्युरेट 35 टक्के मार्क्स मिळवणाचा मान पुण्याच्या शुभम जाधव या नशीबवान विद्यार्थ्याला मिळालाय. तो पुण्यातील रमनबाग शाळेचा विद्यार्थी असून गंजपेठेत राहतो. केवळ योगायोग म्हणून 35 टक्के पडल्याचं तो प्रांजळपणे कबुल करतोय.

शुभम जाधवला सर्वच विषयांमध्ये 35 गुण मिळाले आहेत. तो रमनबाग शाळेत शिकत होता. शुभम जाधव हा गंजपेठेमध्ये वास्तव्यास आहे आणि तो भवानी पेठेतील एका हार्डवेअरच्या दुकानात कामाला देखील जातो. तर त्याचे आई-वडील देखील मोलमजुरी करतात. शुभमला पुढे जाऊन पोलीस बनायचं आहे. त्यासाठी त्याला कॉमर्सला प्रवेश घ्यायचा आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा या आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असल्याचं मानलं जातं. कारण या परीक्षांनंतर आपण आपल्याला हवं असणाऱ्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी शिक्षणासाठी प्रवेश करतो. त्या प्रवेशासाठी मेरीटमध्ये आपलं नाव येणं गरजेचं असतं. पण तरीही दहावी आणि बारावीची परीक्षाचं आपलं सारं काही नाही. आपण आपल्या आयुष्याला संधी द्यायला हवी. आपल्याला कमी गुण मिळाले तरी मागे हटायचं नाही. जे घडलं ते मागे सारायचं आणि आता पुढचं बघायचं. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण प्रामाणिक प्रयत्न करायचे आणि आपल्या आयुष्याला कलाटणी द्यायचा, असे सकारात्मक विचार शुभमचे आहेत.

दहावीत 35 टक्के मिळवणाऱ्या शुभमला आपल्याला मिळालेल्या गुणांबद्दल थोडसं वाईट वाटतंय. पण 35 टक्के मिळायलाय नशीब लागतं, असं तो आवर्जून सांगतोय. त्याला दहावीत 35 टक्के मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्याच्या घरी दाखल झाले आहेत. त्यामुळे शुभमचा चांगलाच गाजावाजा होतोय. शुभम आपल्या निकालावर नाराज जरी असला तरी त्याने हार मानलेली नाही. शुभम हा खूप मेहनती मुलगा. तो हार्डवेअरच्या दुाकानात काम करायचा आणि दहावीचं शिक्षणही घ्यायचा. त्याचे आई-वडीलही मोलमजुरी करतात. त्यामुळे या होतकरु कुटुंबाचा मेहनतीवर विश्वास आहे. शुभम यापुढे आपल्या करिअरसाठी खूप मेहनत करणार आहे, असा निश्चय त्याने केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *