महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ जून । राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या (MLC Election) पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत असताना दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (President Election) विविध घडामोडी घडत आहेत. येत्या 18 जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपला (BJP) घेरण्यासाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. भाजपच्या विरोधातील जवळपास सर्वच पक्ष या निवडणुकीत एकत्र आले आहेत. या विरोधकांनी सर्वानुमते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव सुचवलं होतं. पण शरद पवारांनी तो प्रस्ताव प्रांजळपणे नाकारला होता. त्यानंतर विरोधकांकडून आता महाराष्ट्रातील (Maharashtra) आणखी एका दिग्गज नेत्याला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याबाबतची चर्चा सुरु आहे. विरोधकांकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यासाठी हालचाली देखील तशा घडताना दिसत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशीलकुमार शिंदे यांना काँग्रेसच्या बैठकीसाठी तातडीचे निमंत्रण आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीने सुशीलकुमार यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतलं आहे. त्यानुसार सुशीलकुमार शिंदे आज दिल्लीकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे सुशीलकुमार यांचे रविवारचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचा उमेदवार शोधण्याची प्रक्रिया सुरु आहे. विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. सुशीलकुमार यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे. त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदही भुषवलं आहे. याशिवाय त्यांनी देशाचं केंद्रीय गृहमंत्रीपदाची देखील धुरा सांभाळली आहे. त्यांचा राजकीय अनुभव पाहता विरोधकांकडून सुशीलकुमार यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा आहे.
विशेष म्हणजे 2002 मध्ये भैरोसिंग शेखावत यांच्याविरूद्ध उपराष्ट्रपती पदासाठी सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे यावेळी विरोधकांकडून सुशीलकुमार शिंदे यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जावू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.