Maharashtra Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणूक रंगतदार होणार ; शेवटच्या क्षणी ‘तो’ आमदार न्यूयॉर्कवरुन परतला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२० जून । राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान होत असून दहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपाने महाविकास आघाडीला चितपट करत आपले सर्व उमेदवार निवडून आणले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरणार असा विश्वास भाजपा आमदार व्यक्त करत आहेत. दहाव्यासाठी एक एक मत महत्वाचं ठरणार आहे. यातच राज्यसभा निवडणुकीवेळी बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतांची जोरदार चर्चा झाली होती. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही बविआच्या तीन मतांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

बहुजन विकास आघाडीचे आमदार आणि हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र न्यूयॉर्कला गेले होते. त्यामुळे ते विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात होतं. पण नेमकं मतदानाच्या दिवशी आमदार क्षितीज ठाकूर मुंबईत परतले आहेत. त्यामुळे ते आज मतदानाला उपस्थित राहणार आहेत.

हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांची मतं मिळावीत यासाठी राज्यातील प्रमुख उमेदवारांनी त्यांची भेट घेतली होती. पण क्षितीज ठाकूर नातेवाईकाच्या उपचारासाठी न्यूयॉर्कला गेल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मतदानाला ते उपस्थित नसतील अशी चर्चा होती. अखेरीस ते आज मुंबईत पोहोचले असून मतदान करणार आहे. बविआची ही तीन मतं कुणाला जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

रात्री उशिरा मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या आघाडीच्या नेत्यांनी फोनवरून चर्चा केली. दरम्यान, फोर सीझन हॉटेलमध्ये जाऊन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रात्री उशिरा काँग्रेसचे नेते व आमदारांशी चर्चा केली. देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्ष आमदार मुक्कामी असलेल्या हॉटेलात जाऊन मार्गदर्शन केले. ‘चिंता करू नका, आपल्याला विजय सोपा नसला तरी अशक्यप्राय काहीही नाही’ या शब्दांत विश्वास व्यक्त केला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना काळजीपूर्वक मतदान करण्याचा सल्ला दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *