महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२० जून । महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमाकांचा पालखी सोहळ्याचे मान असलेल्या पैठणच्या संत एकनाथ महाराज यांची पालखीचे आज प्रस्थान होणार आहे. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेस पैठण येथून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. तब्बल 19 मुक्काम करत नाथांची पालखी 9 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार आहे.
आज सायंकाळी सूर्यास्तवेळात शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा पवित्र पादुका पालखी सोहळा पंढरपूर येथील सोहळ्यामध्ये सहभाग घेण्यासाठी प्रस्तान होणार आहे. या पायी दिंडी पालखी सोहळ्यामध्ये जवळपास 30 ते 35 हजार महिला पुरुष वारकरी दरवर्षीप्रमाणे सहभागी होतात. या पालखी सोहळ्यामध्ये 19 ठिकाणी मुक्काम केल्यानंतर 20 वा मुक्काम थेट पंढरपुरात केला जातो. दरम्यान 9 जुलै रोजी नाथांची पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. तर पहिला मुक्काम चनकवाडी येथे होणार असून, त्यांनतर पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने निघेल.
या सोहळ्याचे भव्य प्रस्थान तयारी नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांच्यावतीने योगेश महाराज, ज्ञानेश महाराज गोसावी पालखीवाले यांनी केले आहे. तसेच या सोहळ्यानिमित्त पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थितीत प्रस्थान सोहळा संपन्न होईल. गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाची परिस्थिती पाहता अनेक भाविकांना पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता आले नव्हते. मात्र यावेळी भाविकांना पालखी सोहळ्याचे आनंद घेता येणार असल्याने, मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.