महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२० जून । सर्वसामान्य जनतेचं वाढत्या महागाईमुळे (Inflation) घरखर्चाचं बजेट कोलमडलं आहे. या महागाई बोजाखाली दबलेल्या सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. खाद्यतेलाचे भाव गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना खिशाला परवडत नाहीत. खाद्यतेलाच्या (Edible Oil) वाढलेल्या किमतींमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र आता पुन्हा एकदा तेलाच्या दरात कपात केली जात आहे. अदानी-विल्मरने (Adani Wilmar) खाद्यतेलाच्या किमती प्रति लिटर 10 रुपयांनी कमी केल्या आहेत. खाद्यतेलाच्या किमतीत आणखी कपात होऊ शकते. झी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
अदानी विल्मारने फॉर्च्युन रिफाइंड सनफ्लॉवर ऑइलची एक लिटर किंमत 220 रुपये प्रति लिटरवरून 210 रुपये केली आहे. कंपनीने एक निवेदन जारी करून सांगितले की, मोहरीच्या तेलाची एक लिटर किंमतही 205 रुपयांवरून 195 रुपये करण्यात आली आहे. याशिवाय जेमिनी एडिबल अँड फॅट्सने सूर्यफूल तेलाच्या एक लिटर पॅकेटवर 15 रुपयांची कपात केली आहे. कंपनी किमतीत आणखी कपात करू शकते असे सांगण्यात येत आहे.
पामतेलाच्या कमी पुरवठ्यामुळे खाद्यतेलाच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. आता केंद्र सरकारने पामतेलावरील आयात शुल्कात कपात केल्यानंतर खाद्यतेल कंपन्यांनीही दरात कपात केली आहे. कंपन्यांनी सांगितले की, ‘आम्हाला जो फायदा मिळत आहे तो ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करत आहेत.भारत सरकार इंडोनेशियाला गहू निर्यात करेल आणि तेथून पामतेल आयात करेल, असे सांगितले जात होते. मात्र, अद्यापपर्यंत सरकारकडून असे कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. असे झाले तर आगामी काळात खाद्यतेलाच्या किमतीत घसरण होऊ शकते.