महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ६ ऑक्टोबर | पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर भेदरलेल्या पाकिस्तानने भारताकडे युद्धविरामाची झोळी पसरवल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर काही दिवस लोटल्यानंतर पाकिस्तानकडून भारताविरोधात गरळ ओकण्याचं काम सुरूच असल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हे सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आणखी एक विधान केलं आहे. ‘आता युद्ध झालं तर भारत स्वतःच्या लढाऊ विमानांच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाईल’, असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे. त्या बरोबरच देशाच्या देशांतर्गत आव्हानांवरून नागरिकांचं लक्ष विचलित करण्यासाठी भारत मुद्दामहून तणाव वाढवत असल्याचा आरोपही आसिफ यांनी केला. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
भारतीय लष्करप्रमुखांच्या वक्तव्यानंतर ख्वाजा आसिफ यांची धमकी
भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटलं होतं की, “पाकिस्तान अशा प्रकारे दहशतवादाला पाठिंबा देत राहिल्यास जगाच्या नकाशावरून मिटवलं जाईल.” दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर आता ख्वाजा आसिफ यांनी भारताला धमकी दिली, ते म्हणाले की,”आता युद्ध झालं तर भारत स्वतःच्या लढाऊ विमानांच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाईल.ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कर आणि राजकीय नेते अशा प्रकारची विधाने करत आहेत, याचं कारण त्यांनी गमावलेली विश्वासार्हता ते आता पुन्हा निर्माण करण्याचा त्यांचा हा अयशस्वी प्रयत्न आहे.”
“पाकिस्तानी लष्कराकडे भारतात घुसून लढण्याची ताकद”
“दहशतवादाला खतपाणी घालणं थांबवा, अन्यथा नकाशावरून मिटवू”, असा इशारा भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला दिला होता. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने म्हटलं होतं की, “आमचं सैन्य शत्रूच्या घरात घुसून लढाई करण्यास सक्षम आहे.” पाकिस्तानी लष्कराने यासंदर्भात एक अधिकृत निवेदन जारी केलं होतं. यामध्ये म्हटलं होतं की “भारताचे संरक्षण मंत्री, लष्करप्रमुख व हवाईदलाच्या प्रमुखांनी चिथावणीखोर वक्तव्ये केली आहे. मात्र, त्यांना माहिती असायला हवं की भविष्यात कुठल्याही प्रकारचा संघर्ष खूप विनाशकारी ठरू शकतो.”
पाकिस्तानने म्हटलं होतं की “अनावश्यक धमक्या आणि कारण नसताना केलेल्या हल्ल्यांना तोंड देताना, पाकिस्तानचे लोक, सशस्त्र सेना शत्रूच्या प्रदेशात लढण्याची क्षमता व दृढनिश्चय बाळगून आहे. भारतात घुसून लढण्याची ताकद पाकिस्तानी लष्कराकडे आहे. या वेळी आम्ही भौगोलिक सीमांमागील धारणा मोडून काढू आणि देशाच्या (भारताच्या) सर्वात दुर्गम भागांत घुसू. पाकिस्तानला नकाशावरून हटवण्याच्या बाबतीत भारताने समजून घेतलं पाहिजे की अशा परिस्थितीचा परिणाम दोन्ही बाजूंना भोगावा लागेल.”