महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२१ जून । पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवला कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा साथीदार विक्रम ब्रारने मध्य प्रदेशात दोन पिस्तुले आणि दारूगोळा आणण्यासाठी पाठविले होते. त्यापैकी एका पिस्तुलाचा वापर ओंकार बाणखेलेच्या खुनासाठी केल्याची कबुली संतोषने दिली आहे. हे पिस्तूल जप्त करण्यात आले असून, उर्वरित पिस्तूल आणि दारूगोळा हस्तगत करायचा आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी न्यायालयाला दिली.
संतोष जाधवच्या टोळीतील सदस्यांकडून १३ पिस्तुले जप्त करण्यात आली असून, मध्य प्रदेशातील ‘जॅक स्पॅरो’नामक व्यक्तीकडून ती मिळविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे, असेही बोंबटकर यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर संतोष सुनील जाधव (वय २७, रा. पोखरी, आंबेगाव, सध्या रा. मंचर) आणि त्याला फरारी असताना आश्रय देणारे सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाल (वय १९, रा. नारायणगाव, जुन्नर), नवनाथ सुरेश सूर्यवंशी (वय २८, विखले, खटाव, सातारा, सध्या रा. भूज, गुजरात) आणि तेजस कैलास शिंदे (वय २२, रा. नारायणगाव, जुन्नर) यांना विशेष न्यायालयाने २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.