Monsoon Update : राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना आज ‘ऑरेंज अॅलर्ट’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२१ जून । मुंबईसह राज्यातील अनेक भागात मान्सून पोहोचला असला तरी अद्याप धो-धो पाऊस कुठेही झालेला नाही. परंतु कोकण परिसरास आज, मंगळवारी ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला आहे.

मुंबईसह कोकण परिसरात १८ जूनपासून मान्सून सक्रिय होईल, असे सांगितले जात होते. त्यानुसार रविवार सायंकाळपासून सोमवारी दुपारपर्यंत कोकणात काही ठिकाणी सरी कोसळल्या. पालघर जिल्ह्यात सोमवारी सकाळी सुमारे तीन तास जोरदार पाऊस सुरू होता. ठाणे परिसरात सोमवारी काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. तर मुंबईत सोमवारी दिवसभर अधून-मधून पाऊस पडत होता. मात्र वातावरण दिवसभर ढगाळ होते. अशा सर्व पार्श्वभूमीवर आता मंगळवारसाठी कोकणला इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अनुमानानुसार, मंगळवारी कोकणात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर एक-दोन ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे. पालघर वगळता मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. अरबी समुद्रात दक्षिणोत्तर किनारपट्टीच्या दिशेने कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते आर्द्रतायुक्त समुद्रीय पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे बळकट होत आहे. परिणामी पुढील ५ दिवस कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान मुंबईत उपनगरांपेक्षा शहरी भागात पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून येत आहे. रविवार सकाळी ८.३० ते सोमवारी सकाळी ८.३० या दरम्यान कुलाबा येथे ६७ तर सांताक्रूझ येथे १२.५० मिमी पावसाची नोंद झाली. मात्र सोमवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान कुलाबा येथील पावसाचा जोर मंदावला. तेथे फक्त १२.७० मिमी पावसाची नोंद झाली. तर याच कालावधीत सांताक्रूझ येथे फक्त ३.३० मिमी पावसाची नोंद झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *