महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२१ जून । संपूर्ण राज्याला प्रचंड उत्सुकता लागून असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पाचवी जागा जिंकत महाविकास आघाडीवर मात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा राज्यसभेप्रमाणेच यावेळीही दिसला. महाविकास आघाडीला पाच जागा मिळाल्या पण सहावी जागा गमवावी लागल्याने मोठा धक्का बसला आहे. दहाव्या जागेवर कोण जिंकणार भाजपचे प्रसाद लाड की काँग्रेसचे भाई जगताप अशी उत्कंठा असताना दोघेही जिंकले आणि काँग्रेसचे पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा धक्कादायक पराभव झाला.
दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात होते. कोणत्या एका उमेदवाराची विकेट जाणार याची राजकीय वर्तुळात गेले काही दिवस मोठी उत्सुकता होती. या सामन्यात भाजपने बाजी मारली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का दिला. राज्यसभा निवडणुकीत मतांचे नियोजन आणि अपक्ष व लहान पक्षांची मते खेचून आणत फडणवीस यांनी तिसरा उमेदवार निवडून आणला होता. यावेळी या दोन्ही घटकांबरोबरच महाविकास आघाडीतील मते भाजपने फोडत फडणवीस यांनी विजयश्री अक्षरश: खेचून आणली. दोन मते बाद ठरली. एकूण मतदान २८३ इतके होते.