कोरोना लढ्यात सहभागासाठी 21 हजार अर्ज; डॉक्टर, परिचारिकांना संबंधित जिल्ह्यांत देणार नियुक्त्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई : कोरोना युद्धात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आरोग्य क्षेत्राशी संबंधित २१ हजार जणांनी तशी इच्छा व्यक्त केली असून त्यांचे अर्ज आता छाननी करून त्या-त्या जिल्ह्यांकडे प्रत्यक्ष सोपवण्याचे काम सुरू आहे. कोरोनाच्या या लढ्यात शासनाला प्रत्यक्ष सहभागी होऊन मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. डॉक्टर्स, आरोग्य सेवेत काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका, वॉर्डबॉय, आरोग्य सेवेत प्रशिक्षण पूर्ण केलेले, परंतु ज्यांना जागा नाही म्हणून काम मिळाले नाही, पण त्यांना काम करण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी पुढे येऊन आपले नाव, पत्ता covidyoddha@gmail.com या ई-मेलवर नोंदवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते.

अवघ्या ५ दिवसांत २१ हजार जणांनी विविध अर्ज करून तशी इच्छा व्यक्त केली. यामध्ये ९४३ डॉक्टर्स, ३३१२ परिचारिका, ११४१ फार्मसिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ८६३, वॉर्डबॉय ७६६, पॅरा वैद्यकीय ६१४, इतर वैद्यकीय ५६९, सैन्यातील निवृत्त ७६ तसेच इतर व्यक्तींमध्ये समाजसेवक, वैद्यकीय स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी अर्ज करण्यात आले आहेत. या सर्वांसाठी एक गुगल फॉर्म देण्यात आला. त्यातून सुमारे १८ हजार व्यक्तींनी हे फॉर्म भरून दिले.

आता या व्यक्तींना आवश्यकतेनुसार विविध जिल्ह्यांत पाठवण्यात येईल. संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी या वैद्यकीय स्वयंसेवकांना जबाबदारी देतील, असे सोमवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *