Sanjay Raut: संजय राऊतांचं सूचक ट्विट ; वाटचाल विधानसभा बरखास्तीच्या दिशेनं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ जून । बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या शक्तीशाली प्रदर्शनापुढे आणि त्यांना असलेल्या आमदारांच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर काहीही पर्याय उरलेला नाहीय. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे आता लक्ष ठेवून राहायचं, असं मुख्यमंत्र्यांचं ठरलेलं असतानाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचं प्लॅन फोडणारं ट्विट केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरु आहे, असं ट्विट राऊतांनी केलं आहे. म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याचे संकेतच संजय राऊतांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळच बरखास्त होईल.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खिळखिळी केल्यानंतर ठाकरे सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. शिंदेशाहीच्या शक्तीप्रदर्शनापुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही हतबल आहेत. अशातच सरकार कोसळण्याच्या चर्चा सुरु असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवरुन मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन बायो हटवल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास ३२ ते ३३ आमदार आहेत. शिवसेना आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे आसामच्या गुवाहटीमध्ये पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे यांनी काल ट्विट करुन मी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार सोडला नसल्याचं म्हटलं आहे. आता आदित्य ठाकरे यांनी मंत्रिपदाचा उल्लेख हटवला असला तरी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटरवरुन शिवसेनेचा उल्लेख हटवलेला नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *